शटर तोडून चोरी करण्यास दुकानामध्ये चोर शिरला अन् अडकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 21:56 IST2017-09-14T21:55:08+5:302017-09-14T21:56:05+5:30
घरफोडी करणारे दोघे मध्यरात्रीच्या सुमारास इंदिरानगर भागातील एका शालेय साहित्यविक्री करणाºया दुकानाचे शटर उचकटून आत शिरले

शटर तोडून चोरी करण्यास दुकानामध्ये चोर शिरला अन् अडकला
इंदिरानगर : घरफोडी करणारे दोघे मध्यरात्रीच्या सुमारास इंदिरानगर भागातील एका शालेय साहित्यविक्री करणाºया दुकानाचे शटर उचकटून आत शिरले; मात्र दुकानामधून दोघांपैकी एक चोर पळून जाण्यात यशस्वी झाला, तर दुसºयाला मात्र पहाट उजाडेपर्यंत बाहेर पडण्याचा ‘मार्ग’ मोकळा झाला नाही. त्यामुळे नागरिकांना तो सहज सापडला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बापू बंगला या मुख्य चौकामध्ये असलेल्या विद्यालक्ष्मी स्टेशनर्स या दुकानामध्ये चोरट्यांनी शटर तोडून प्रवेश केला. दोघा चोरट्यांपैकी एकाने अडीच ते तीन हजार रुपयांचे साहित्य घेऊन पोबारा केला; मात्र त्याचा दुसरा साथीदार दुकानात अडकून राहिला. त्याला बाहेर पडणे मुश्कील झाले. त्याचे पहाटेपर्यंत पळून जाण्याचे प्रयत्न सुरू होते; मात्र सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले अखेर सकाळी दुकानाचे शटर तोडल्याचे लक्षात आल्यावर नागरिकांनी दुकानमालकासह पोलिसांना सदर बाब कळविली. यावेळी पोलीस घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी आले असता त्यांनी शटर उघडले तेव्हा दुकानामध्येच त्यांना चोरटा मिळून आला. पोलिसांनी तत्काळ त्यास बेड्या ठोकल्या. त्याची कसून चौकशी केली असता त्याने एक साथीदार साहित्य घेऊन पळून गेल्याची कबुली दिली आहे. संपूर्ण दिवस उलटूनही पोलिसांना त्याच्या दुसºया साथीदाराचा थांगपत्ता लागला नाही.