दप्तर तपासणीचा अहवाल पाठविणार
By Admin | Updated: December 3, 2015 23:55 IST2015-12-03T23:54:47+5:302015-12-03T23:55:27+5:30
दप्तर तपासणीचा अहवाल पाठविणार

दप्तर तपासणीचा अहवाल पाठविणार
नाशिक : दप्तराच्या ओझ्यातून विद्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी शासनाच्या नवीन निर्णयानुसार संबंधित शाळांनी कारवाई केली किंवा नाही? याबाबत शिक्षण विभागाच्या भरारी पथकामार्फत गेल्या तीन ते चार दिवसांपासून तपासणी सुरू आहे. गुरुवारी (दि.३) प्राथमिक शिक्षणाधिकारी रहीम मोगल व माध्यमिक शिक्षणाधिकारी नवनाथ औताडे यांच्या भरारी पथकाने त्र्यंबकेश्वररोडवरील फ्रावशी इंटरनॅशनल स्कूलमध्ये भेट देऊन विद्यार्थ्यांच्या दप्तराची तपासणी केली.
जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे वजन व त्या अनुषंगाने असलेले दप्तराचे वजन यांची तपासणी करून शासन नियमानुसार ते आहे की नाही, याची तपासणी करण्यासाठी जिल्ह्यात १५ भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली असून, त्यात १४ शिक्षकांचा समावेश आहे. तसेच जिल्हास्तरीय भरारी पथकात प्राथमिक शिक्षणाधिकारी व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यार्थ्यांच्या एकूण वजनाच्या १० टक्क्यांपेक्षा जास्त वजन दप्तराचे नसावे. फ्रावशी शाळेतील पाचवी व आठवीतील सुमारे १५ ते १६ विद्यार्थ्यांच्या वजनाची व दप्तरांची तपासणी करण्यात आली. त्यात नियमानुसार नसलेल्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात ८ दिवसांच्या आत सुधारणा करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी रहीम मोगल यांनी दिले. येत्या ७ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांच्या दप्तर तपासणीचा अहवाल मागविण्यात आला असून, तो नंतर शासनाला सादर करण्यात येणार असल्याचे कळते. (प्रतिनिधी)