पेठला लाच घेताना दोघांना पकडले
By Admin | Updated: September 16, 2015 22:16 IST2015-09-16T22:08:26+5:302015-09-16T22:16:31+5:30
कारवाई : उताऱ्यासाठी ७०० रुपयांची मागणी

पेठला लाच घेताना दोघांना पकडले
पेठ : येथील तहसील कार्यालयातील अभिलेख कक्षातील लिपिकासह शिपायाला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.तक्रारदार यांची मौजे तीर्ढे येथे वडिलोपार्जित शेतजमीन आहे़ या जमिनीचे सन १९६५ पासूनचे उतारे व नोंदी मिळवण्यासाठी त्यांनी मागच्याच वर्षी रितसर अर्ज सादर केला होता़ अनेक दिवस उलटूनही उतारे मिळत नसल्याने तक्रारदार यांनी अभिलेख कक्षातील लिपिक प्रवीण रमेश पवार यांची दोन दिवसांपूर्वी भेट घेतली़ उतारे व नोंदीचे कागदपत्र देण्यासाठी पवार यांनी त्याच्याकडे एक हजार रुपयांची मागणी केली होती. अखेर सातशे रुपयात तडजोड करून बुधवारी रक्कम देण्याचे ठरले़ तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाकडे रितसर तक्रार नोंदवल्याने या विभागाचे अधिकारी सतीश प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला़ बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास शिपाई मनोहर के. पवार यांच्या हस्ते सातशे रुपये स्वीकारताना त्यास रंगेहात पकडण्यात आले़
सदरची कारवाई अधीक्षक सतीश प्रधान, उपधीक्षक प्रशांत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक पवार, नितीन देशमुख, हवालदार खेगडे, खंदीलकर, विनोद पवार आदिंनी केली़ याबाबत दोन्ही संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आली
असून, त्यांना ताब्यात घेण्यात आले़ (वार्ताहर)