कडाक्याच्या उन्हाने शेतकामे ठप्प
By Admin | Updated: May 20, 2016 00:27 IST2016-05-19T23:06:22+5:302016-05-20T00:27:25+5:30
उष्णतेची लाट : ग्रामीण भागात रस्ते ओस; चांदवडचा पारा ४२ अंशांवर

कडाक्याच्या उन्हाने शेतकामे ठप्प
खामखेडा : परिसरामध्ये गेल्या आठवड्यात उन्हामध्ये अचानक वाढ झाल्याने दुपारच्या वेळेस घरातून कोणीही बाहेर पडले नाही. दुपारी रस्ते ओस पडत आहेत. त्यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
मागच्या आठवड्यात झालेला पाऊस व ठिकठिकाणी झालेली गारपिटीमुळे उष्णतेत वाढ झाल्याने अचानक उकाडा जाणवू लागला आहे. सकाळी ८ वाजेपासून सूर्यदेवता आग ओकण्यास सुरुवात करत असल्याने उकाडा जाणवू लागतो. दुपारच्या वेळेस घराबाहेर पडत नाही त्यामुळे रस्त्यावर वर्दळ दिसून नसल्याचे चित्र ग्रामीण भागामध्ये दिसून येत आहे. कडक उन्हामुळे शेतात काम करणारे मजूर व शेतकरी याच्याही कामाच्या वेळापत्रकामध्ये बदल झालेला दिसून येत आहे. सकाळी लवकर शेतात जाऊन पिकांना पाणी देणे, शेत मशागतीची कामे करून ११ वाजेनंतर घरीच आराम करून ४ वाजता पुन्हा शेतात जाऊन कामे करताना दिसत आहेत. तसेच शेतात काम करणारे शेतमजूर सकाळच्या वेळेस लवकर शेतात जाऊन दुपारी १२ वाजेपर्यंत कामे करून दुपारी झाडाच्या सावलीत आराम करून ४ वाजेनंतर पुन्हा शेतात कामे करून सायंकाळी उशिरा घरी येतात.
पशुपालकही सकाळी आपली गुरे-मेंढ्या-बकऱ्या आदि जनावरे चरण्यासाठी सकाळी लवकर नेऊन दुपारच्या वेळेस आपली जनावरे झाडाच्या सावली खाली असल्याचे चित्र सर्वत्र पहावयासस मिळत आहे. या उन्हामुळे नागरिक हैराण झाले असून, या कडक उष्णतेमुळे नदीकिनारी नागरिकांची वर्दळ दिसून येत आहे. गिरणा नदीला चणकापूर व पुनंद धरणातून पाणी सोडण्यात आलेले असल्याने दुपारच्या वेळेस बालगोपाळांसह वृद्ध नदीत पोहण्याचा आनंद लुटत आहे. सध्या शिवारात जनावरांना पिण्यासाठी पाणी नसल्याने दुपारच्या वेळेस पशुपालक आपली जनावरे पाणी पर्जन्यासाठी नदीत नेऊन तेथेच झाडाच्या सावलीत आपली गुरे, शेळ्या-मेंढ्या बसवून नदीत डुंबण्याच्या आनंद घेताना दिसून येतात. बाहेर पडणारे डोक्यात टोपी अथवा डोक्याला उपरणे बांधून व डोळ्यावर गॉगल लावून फिरताना दिसतात.
(लोकमत ब्युरो)