शहरात आता एकवेळच पाणीपुरवठा होणार

By Admin | Updated: July 13, 2016 00:04 IST2016-07-12T23:44:42+5:302016-07-13T00:04:19+5:30

राजकीय तयारी : मुबलक पाणी देण्याची करणार व्यवस्था; महासभेत होणार अंतिम निर्णय

There will be water supply once in the city | शहरात आता एकवेळच पाणीपुरवठा होणार

शहरात आता एकवेळच पाणीपुरवठा होणार

नाशिक : शहरात पाणीकपातीचा भाग म्हणून सुरू असलेला एकवेळ पाणीपुरवठा आता कायम होण्याची चिन्हे आहेत. सामान्यत: एकवेळ पाणी द्या, परंतु मुबलक द्या या जनसामान्यांच्या मागणीला प्रतिसाद देत आता यानंतरच्या काळात दैनंदिन वीस टक्के पाणीकपात रद्द करण्यात आली तरी एकच वेळ मुबलक पाणीपुरवठा करावा, असे मत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
शहरात पाणीकपात करण्याअगोदरपासूनच सिडको आणि सातपूर या दोन विभागात एकवेळच पाणीपुरवठा होतो. पूर्व आणि पश्चिम नाशिक तसेच पंचवटी आणि नाशिकरोड या दोन विभागात सकाळ आणि सायंकाळ असा दोन वेळा पाणीपुरवठा होत असतो. परंतु गेल्या वर्षी आॅक्टोबर महिन्यात महापालिकेने शहरात वीस टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर महापालिकेने सहाही विभागात एकवेळच परंतु पुरेसे पाणी देण्याचे ठरविले होते. त्यानुसार कार्यवाही करण्यात आली. शहरात वीस टक्के पाणीकपात करून एकवेळ पाणीपुरवठा करण्याचा प्रयोग यंदाच नाही तर यापूर्वीही अनेकदा राबविण्यात आला आहे. एकवेळ पाणीपुरवठ्याला सध्या सामान्य नागरिकांचा विरोध नाही. एकवेळ पाणीपुरवठा करा, परंतु मुबलक पाणी द्या, अशीच नागरिकांची मागणी असते. अ‍ॅड. यतिन वाघ महापौर असताना पाण्यासंदर्भात बाका प्रसंग उद्भवल्यानंतर त्यांनीही एकवेळ पाणीपुरवठा केला होता. त्यानंतर कपात रद्द केल्यावरही काही भागात अजूनही एकवेळ पाणीपुरवठा करण्यात येत आहे. एकाच जलकुंभावर वाढत्या लोकवस्तीचा ताण वाढल्यानंतर एकाच वेळी सर्व भागात मुबलक पाणी देता येत नाही. अशावेळी दोन सत्रात दोन वेगवेगळ्या भागांना पाणीपुरवठा केला तर ते अधिक सोयीचे होऊ शकते, असे लक्षात आल्यानंतर या भागात एकवेळ पाणीपुरवठ्याचा प्रयोग कायमस्वरूपी करण्यात आला आहे. आता याच धर्तीवर संपूर्ण शहरात एकवेळ पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. (प्रतिनिधी)

Web Title: There will be water supply once in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.