राज्यातील दोन लाख ९९ हजार ४४४ अतिक्रमणे होणार कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 17:39 IST2019-03-06T17:39:42+5:302019-03-06T17:39:57+5:30
मालेगाव : राज्यातील गावठाणवरील व महापालिका क्षेत्रातील गावठाण गायराण जमिनीवरील निवासी घरांचे अतिक्रमणे नियमानुकूल करण्यात येत आहेत.

राज्यातील दोन लाख ९९ हजार ४४४ अतिक्रमणे होणार कायम
मालेगाव : राज्यातील गावठाणवरील व महापालिका क्षेत्रातील गावठाण गायराण जमिनीवरील निवासी घरांचे अतिक्रमणे नियमानुकूल करण्यात येत आहेत. राज्यभरातील दोन लाख ९९ हजार ४४४ अतिक्रमणे कायम होणार आहेत. मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मालेगाव तालुक्यातील पाच लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात अतिक्रमणे नियमानुकूल प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे उपस्थित होते.
मालेगाव तालुक्यातील अतिक्रमणे कायम करण्यासाठी २००४ पासून कागदोपत्री प्रक्रिया सुरू होती. केंद्र व राज्य शासनाने २०२२ पर्यंत ग्रामीण भागातील सर्व बेघर कुटुंबांना घरे देण्याचा निर्णय घेतला आहे. या धोरणाचे प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण भागातील शासकीय जमिनींवरील निवासी प्रयोजनासाठी केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्याबाबत ग्रामविकास विभागाने १६ फेब्रुवारी २०१८ ला निर्णय घेतला होता. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे. राज्यातील ग्रामीण भागातील ३४ जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील एकूण चार लाख ७३ हजार २४८ अतिक्रमणांची नोंदी संगणकावर करण्यात आल्या होत्या. त्यापैकी २ लाख ९९ हजार ४४४ अतिक्रमणे १ जानेवारी २०११ पूर्वीची आहेत. ९९ हजार ६१५ अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची कारवाई ग्रामसभेत करून गटविकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रमाणित केल्यानंतर ही अतिक्रमणे नियमनुकूल करण्यात आली आहेत.