करंजगावसह परिसरात बिबट्याची दहशत कायम
By Admin | Updated: October 30, 2014 22:33 IST2014-10-30T22:33:43+5:302014-10-30T22:33:53+5:30
करंजगावसह परिसरात बिबट्याची दहशत कायम

करंजगावसह परिसरात बिबट्याची दहशत कायम
करंजगाव : निफाड तालुक्यातील गोदाकाठ आणि करंजगाव परिसरात वारंवार बिबट्याचे नागरिकांना दर्शन होत असल्याने दहशतीचे वातावरण आहे. मागील आठवड्यात करंजगावी ओम सतीश पावशे या चारवर्षीय बालकावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला होता. मात्र सुदैवाने बालक बचावला. सिन्नर वनविभागाने करंजगावी पावशे वस्तीवर एक पिंजरा लावला आहे. तसेच भुसे येथेही पिंजरा लावला आहे. मात्र अद्यापही बिबट्यांना जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलेले नाही. करंजगाव परिसरात तीन ते चार बिबट्यांचा वावर असून, शेतकऱ्यांना पिकांना दिवसा पाणी देणेही मुश्कील झाले आहे. शिवारामध्ये राहणारे नागरिक सायंकाळनंतर घराबाहेरच पडत नाही. दिवाळीच्या धामधुमीतही करंजगावी बिबट्याच्या दहशतीने अपेक्षित संचारबंदी सुरू आहे. वनविभागाने या परिसरात पिंजऱ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी केली आहे. या बिबट्यांनी अनेक कुत्रे, बकरींचा फडशा पाडला असून, त्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामपालिका सदस्य सागर जाधव यांनी केली आहे.(वार्ताहर)