नाशिक शहरात पाणी कपात नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:14 IST2021-05-23T04:14:03+5:302021-05-23T04:14:03+5:30
नाशिक- शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने यंदाच्या वर्षी पाणी कपात केली जाणार नाही, अशी माहिती ...

नाशिक शहरात पाणी कपात नाही
नाशिक- शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने यंदाच्या वर्षी पाणी कपात केली जाणार नाही, अशी माहिती महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिली. अर्थात, धरणात मुबलक साठा असला तरी नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन त्यांनी केले. मे महिना सुरू असल्याने जिल्ह्यातील जलाशयातील साठा कमी झाला आहे. त्यातच दारणा धरणात महापालिकेला ४०० दशलक्ष घनफूट आरक्षण मिळाले असले तरी वालदेवी नदीत मलयुक्त पाणी येत असल्याने हे पाणी वापरता येऊ शकत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे नाशिकरोड विभागासाठी गंगापूर धरणातूनच पाणी दिले जात असल्याने अखेरच्या टप्प्यात काही प्रमाणात पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने प्रशासनाने कपातीचा प्रस्ताव सादर केला होता. सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत तोे फेटाळण्यात आला असला तरी महापौर सतीश कुलकर्णी यांनी शनिवारी (दि. २२) धरण साठ्याची पहाणी केली.
महानगरपालिकेच्या वतीने गंगापूर, गौतमी व कश्यपी या समूह धरणांमधून शहरात पाणीपुरवठा केला जात असतो. सध्याच्या गंगापूर धरणातील पाणीसाठ्याची माहिती घेऊन पाणी कपातीबाबतचा निर्णय घेण्यात येणार होता. त्यामुळे गंगापूर धरणातील पाण्याच्या साठ्याची पाहणी महापौर सतीश कुलकर्णी तसेच सभागृह नेते सतीश सोनवणे, अधीक्षक अभियंता संदीप नलावडे, कार्यकारी अभियंता शिवाजी चव्हाणके, अविनाश धनाईत, पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता सुभाष मिसाळ यांनी केली.
सध्याचा उपलब्ध पाणीसाठा व असणारी आवश्यकता याची सविस्तर माहिती यावेळी घेण्यात आली. धरणात सध्याच्या परिस्थितीत ४७ टक्के इतका पाणीसाठा असून तो साठा पुरेसा असल्याने नाशिक शहरात सध्याच्या परिस्थितीला पाणी कपात केली जाणार नाही. मात्र, शहरवासीयांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन महापौरांनी यावेळी केले.
इन्फो...
दारणा धरणातील साठा कायम
जलसंपदा विभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेला दारणा धरणातून चारशे दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण दिले आहे; मात्र त्यातील जेमतेम पंधरा दशलक्ष घनफूट पाणी वापरण्यात आले आहे. मलयुक्त पाणी येत असल्याने नोव्हेंबर महिन्यापासून चेहेडी पंपिंग येथील उपसा बंद असून, तो कधी सुरू होणार यावर मात्र कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.
छायाचित्र नीलेश तांबे