मंडपासाठी खड्डे खोदण्यास मनाई
By Admin | Updated: July 30, 2016 00:31 IST2016-07-30T00:25:51+5:302016-07-30T00:31:41+5:30
मनपाकडून नियमावली : येत्या गणेशोत्सवात अंमलबजावणी

मंडपासाठी खड्डे खोदण्यास मनाई
नाशिक : सार्वजनिक उत्सवप्रसंगी यापुढे रस्त्यांवर मंडप उभारताना सार्वजनिक मंडळे-संस्था यांना कमालीची काळजी घ्यावी लागणार असून मंडप उभारणीसाठी रस्त्यांत खड्डे खोदल्यास प्रति खड्डा ५० हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे. महापालिकेच्या महासभेने मंडप उभारणीविषयक ठरावाला मान्यता देत त्यासंबंधीची नियमावली तयार केली असून त्याची अंमलबजावणी या गणेशोत्सवापासून होण्याची शक्यता आहे.
उच्च न्यायालयात दाखल एका जनहित याचिकेनुसार न्यायालयाने सार्वजनिक उत्सव साजरे करताना रहदारीस होणारे अडथळे, ध्वनिप्रदूषण याबाबत उपाययोजना करणारे धोरण आखण्याचे आदेश महापालिकेला दिले होते. त्यानुसार, महापालिका प्रशासनाने मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करत एक नियमावली तयार करून ती महासभेच्या मान्यतेसाठी ठेवली होती. आॅक्टोबर २०१५ मध्ये झालेल्या महासभेने सदर नियमावलीला मंजुरी दिली असून तसा ठराव समन्वय कक्षाला नुकताच प्राप्त झाला आहे. गणेशोत्सव महिनाभरावर येऊन ठेपला असल्याने या नियमावलीची अंमलबजावणी त्यावेळी होण्याची शक्यता आहे. नियमावलीनुसार, सिमेंट कॉँक्रीट, डांबरी रस्ते अथवा पॅसेज असलेल्या जागेत मंडपासाठी खोदाई करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. मंडप उभारणी करायची असल्यास वाळूने भरलेल्या ड्रमचा वापर करण्याची सूचना करण्यात आली असून कोणत्याही परिस्थितीत खड्डे खोदण्यास परवानगी नाकारण्यात येणार आहे. खड्डे खोदल्याचे आढळून आल्यास प्रति खड्डा ५० हजार रुपये इतका दंड आकारण्यात येणार आहे. सदर दंड हा खड्ड्याचा आकार १ बाय १ फूट किंवा त्यापेक्षा कमी असल्यास लागणार आहे. परंतु त्यापेक्षा जास्त आकाराच्या खड्ड्याला सरफेस क्षेत्रफळानुसार प्रति चौरस फूट ५० हजार रुपये दंडाची आकारणी केली जाणार आहे. सदर दंड भरण्यासाठी परवानगी देताना संबंधित अर्जदार किंवा मंडळाकडून शपथपत्र भरून घेतले जाणार आहे. त्यात खड्डे खोदल्यास व दंड न भरल्यास संबंधित व्यक्तीकडून जमीन महसुलाच्या थकबाकीप्रमाणे दंड वसूल केला जाणार आहे. उत्सवात बऱ्याच मंडळांकडून विद्युत जोडणी अनधिकृतपणे घेतली जाते. त्यालाही या नियमावलीनुसार चाप येणार असून अनधिकृतपणे जोडणी घेतल्यास गुन्हा दाखल केला जाणार आहे. नव्या नियमावलीत मंडपाची उभारणी नेमकी कोठे आणि कशा पद्धतीने करावी, फूटपाथवर मंडप उभारणी करू नये आणि ध्वनिप्रदूषणाची पातळी किती असावी यासंबंधीही निर्देश देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)