राज्य आणि केंद्रातही मंत्रिपद हवे
By Admin | Updated: November 24, 2015 23:07 IST2015-11-24T23:07:18+5:302015-11-24T23:07:54+5:30
रामदास आठवले : आमीर खान देश सोडून गेलेच तर परत आणू

राज्य आणि केंद्रातही मंत्रिपद हवे
नाशिक : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होत असून, त्यात ठरल्याप्रमाणे आरपीआयला स्थान दिलेच गेले पाहिजे. आपल्याला राज्यात परतण्याची इच्छा नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शब्द दिल्याप्रमाणे आपल्याला केंद्रात मंत्री करावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी पत्रकारांशी बोेलताना केली.
नाशिक दौऱ्यावर आल्यावर शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. २६ व २७ नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त संसदेचे दोनदिवसीय विशेष हिवाळी अधिवेशन बोलविण्यात आले असून, त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेविषयी आणि संविधानावर चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्यघटनेचे महत्त्व कळाल्यामुळेच त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा दिली. लंडनचे घर विकत घेतले. ते भाजपा व संघाचे नसून देशाचे पंतप्रधान आहेत, म्हणून ते त्यांच्या पक्षाचा रंग तिरंगा सांगत असल्याचे यावेळी खासदार रामदास आठवले यांनी सांगितले. मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असून, भाजपाचा सर्वात मोठा मित्रपक्ष म्हणून आरपीआय असून मंत्रिमंडळात आरपीआयला जागा मिळाली पाहिजे. आपल्या पत्नीला आपण मंत्री करणार असल्याच्या चर्चा सुरू असून, त्या निरर्थक आहेत. मंत्रिमंडळात आपण पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यालाच संधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्याकडे पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांची यादीच तयार असून, त्यातून आपण प्रत्येकाला संधी देणार आहोत. कोणाला मंत्रिपद, तर कोणाला महामंडळावर संधी देणार असल्याचे त्यांनी यावेळी
सांगितले.
आरपीआयचे पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी लवकरच आपण जिल्हानिहाय दौरे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी आरपीआय जिल्हाध्यक्ष नगरसेवक प्रकाश लोंढे, पवन क्षीरसागर, सुनील वाघ, दीपक डोके आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)