निवडणुकीत दुरंगी लढत
By Admin | Updated: December 3, 2015 23:09 IST2015-12-03T23:09:12+5:302015-12-03T23:09:51+5:30
येवला : बाजार समितीचा फळबाग प्रक्रिया विभाग

निवडणुकीत दुरंगी लढत
येवला : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळबाग प्रक्रिया विभागाच्या एका जागेसाठी होत असलेल्या निवडणुकीत गुरुवारी माघारीच्या दिवशी पाच उमेदवारांनी माघार घेतली आहे.
येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या राष्ट्रवादी कॉँग्रेसची सत्ता आहे. गेल्या चार महिन्यांपूर्वी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार छगन भुजबळ, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष अॅड. माणिकराव शिंदे, सहकार नेते अंबादास बनकर यांच्या नेतृत्वाखाली प्रगती पॅनलने १२ जागा मिळवित बाजार समितीत सत्ता प्रस्थापित केली होती. माजी आमदार मारोतराव पवार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे, संभाजीराजे पवार, जिल्हा बँक संचालक किशोर दराडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलने जोरदार लढत देत पाच जागा मिळविल्या होत्या.
तत्कालीन परिस्थितीत बाजार समितीत लढती चांगल्याच रंगल्या होत्या. आता पुन्हा एकदा बाजार समितीच्या फळबाग प्रक्रिया मतदारसंघाच्या एका जागेसाठी सामना रंगत आहे. वसंत पवार, देवीदास निकम, दामोदर पवार या संभाजीराजे पवार, सुधीर जाधव या पाच उमेदवारांनी अर्ज माघारी घेतली आहे. या निवडणुकीत प्रारंभी आमदार भुजबळांनी वसंत पवार व सुभाष निकम यांना अर्ज दाखल करण्याचे निर्देश दिलेले होते. दरम्यान, अॅड. माणिकराव शिंदे यांचे खंदे समर्थक दामोदर पवार यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता. देवीदास निकम यांच्या उमेदवारी अर्जावर सहकार नेते अंबादास बनकर सूचक होते.
या दोघांनाही माघार घ्यावी लागली आहे.
सुभाष निकम हे पूर्वाश्रमीचे माजी आमदार मारोतराव पवार यांचे समर्थक असताना केवळ दूध संघाचे अध्यक्षपद न मिळाल्याने त्यांनी पवारांची साथ सोडून भुजबळांच्या गोटात सामील झाले होते. राष्ट्रवादीत चांगल्या पदावर आपली वर्णी लागेल असा शब्द त्यांना दिला गेला. आमदार भुजबळ यांनी निकम यांना उमेदवारी देऊन शब्द खरा केला असला तरी युद्ध अजून बाकी आहे. चांगले पद म्हणजे अर्थात निकम यांना बाजार समितीच्या संचालकपदाची उमेदवारी असा समजला जात आहे. (वार्ताहर)