मनपा अग्निशमन दलामध्ये अवघे १५४ कर्मचारी कार्यरत
By Admin | Updated: July 23, 2016 01:07 IST2016-07-23T01:05:25+5:302016-07-23T01:07:09+5:30
५५० पदांची गरज : प्रस्ताव अडीच वर्षांपासून प्रलंबित

मनपा अग्निशमन दलामध्ये अवघे १५४ कर्मचारी कार्यरत
नाशिक : महापालिकेच्या अग्निशमन दलामध्ये एकूण ५५० पदांची आवश्यकता असताना सद्यस्थितीत केवळ १५४ कर्मचारी कार्यरत असून, त्याचा ताण आपत्कालीन व्यवस्थेवर होत आहे. दरम्यान, महासभेच्या मंजुरीनंतर ३२० पदे भरतीचा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी गेल्या अडीच वर्षांपासून प्रलंबित आहे.
महापालिकेच्या अग्निशमन दलामध्ये १९९४ च्या मंजूर पदांनुसार १५४ कर्मचारी कार्यरत असून, ६८ पदे रिक्त आहेत. शहराचा वाढता विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता जानेवारी २०१४ मध्ये महासभेने ३२० पदांना मंजुरी देत त्याबाबतचा ठराव शासनाकडे पाठविला होता, परंतु अद्याप शासनाकडून त्याबाबत निर्णय झालेला नाही.
अग्निशमन दलात सुमारे ५५० पदांची आवश्यकता आहे. अग्निशमन दलात सद्य:स्थितीत उपमुख्य अग्निशमन अधिकारी, दोन विभागीय अग्निशमन अधिकारी, सहायक विभागीय अग्निशमन अधिकारी, पाच स्टेशन आॅफिसर, एक सब आॅफिसर आदि पदे रिक्त आहेत. अग्निशमन दलाकडे सध्या ९८ फायरमन कार्यरत आहेत.
प्रत्यक्षात १५१ पदे मंजूर आहेत. परंतु फायरमनची संख्या कमी असल्याने तीन पाळ्यांमध्ये प्रत्येकी १५ फायरमनच्या माध्यमातून आपत्तीचा सामना केला जात आहे. त्यामुळे साहजिकच अपुऱ्या मनुष्यबळामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवरच कामाचा ताण वाढत असून, त्यांच्या एकूणच कार्यक्षमतेवरही परिणाम होताना दिसून येत आहे. (प्रतिनिधी)