शिवसेना-भाजपाचे डझनभर ठिकाणी उमेदवारच नाही
By Admin | Updated: February 15, 2017 00:56 IST2017-02-15T00:56:38+5:302017-02-15T00:56:50+5:30
शिवसेना-भाजपाचे डझनभर ठिकाणी उमेदवारच नाही

शिवसेना-भाजपाचे डझनभर ठिकाणी उमेदवारच नाही
नाशिक : जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी राष्ट्रवादी व कॉँग्रेस या पक्षांना तब्बल ४४ ठिकाणी उमेदवार उभा करता आलेला नाही, तर शिवसेना व भाजपाला त्या तुलनेत १३ ठिकाणी उमेदवार उभे करता आलेले नसल्याचे समजते. यापैकी शिवसेनेला आठ, तर भाजपाला पाच ठिकाणी उमेदवार करता आलेले नाही. यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा शिवसेना व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या येणार असल्याची चर्चा असली तरी प्रत्यक्षात या दोन्ही पक्षांना काही ठिकाणी उमेदवारच मिळालेले नाहीत, हे निवडणुकीच्या आत स्पष्ट झालेल्या चित्रातून दिसत आहेत. शिवसेनेला सुरगाणा तालुक्यातील भवाडा गट वगळता गोंदुणे व हट्टी गटात उमेदवार उभे करता आलेले नाहीत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे निफाडचे आमदार शिवसेनेचे असताना येथून ओझर या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेने उमेदवारच उभा केलेला नाही. ओझर गटाची निवडणूक त्यामुळे चर्चेत आहे. देवळा तालुक्यातील तीनपैकी दोन गटांत शिवसेनेला उमेदवार मिळालेले नाही. लोहणेर व ठेंगोडा गटातून तसेच कळवण तालुक्यातील चारपैकी तीन गटांतून मानूर, अभोणा, कनाशी गटात शिवसेनेला उमेदवार मिळालेले नाहीत. जिल्हा परिषदेसाठी ‘मिशन-४१ प्लस’चे उद्दिष्ट डोळ्यासमोर वाटचाल करणाऱ्या भाजपालाही काही गटांत उमेदवारच उभे करता आलेले नाही. सुरगाणा तालुक्यातील हट्टी गट वगळता गोंदुणे व भवाडा गटांत उमेदवार उभे करता आलेले नाही. तसेच दिंडोरीतील खेडगाव येथे अपक्ष उमेदवारास पुरस्कृत करण्याची वेळ भाजपावर आली आहे. मानूर गटातूनही पक्षाला कोणी उमेदवारच न भेटल्याने येथून राष्ट्रवादी व माकपाचेच दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. येवला तालुक्यातील नगरसूल गटातूनही केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपाला उमेदवार उभा करता आलेला नाही. विशेष म्हणजे आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा व पर्यटनमंत्री जयकुमार रावल जिल्ह्णात तळ ठोकून भाजपासाठी रणनिती आखत असतानाही भाजपावर ही वेळ ओढविली आहे. (प्रतिनिधी)