...तर रास्ता रोको झालाच नसता
By Admin | Updated: October 9, 2015 22:40 IST2015-10-09T22:37:43+5:302015-10-09T22:40:56+5:30
चिमुरड्याचा बळी : वाहतूक शाखेचा सुस्त कारभार

...तर रास्ता रोको झालाच नसता
पंचवटी : बुधवारी दुपारच्या सुमाराला शाळा सुटल्यानंतर नातवंडांसह घराकडे पायी घेऊन जाणाऱ्या आजीसह दोघा नातवंडांना भरधाव जाणाऱ्या शहर बसने धडक दिली. या घटनेत रोनित चव्हाण या अडीचवर्षीय बालकाचा बसच्या चाकाखाली चिरडून दुर्दैवी अंत झाला. या घटनेनंतर वाहतूक शाखेने नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन तसेच कर्तव्य म्हणून त्याच दिवसापासून सेवाकुंजवर वाहतूक पोलिसांची नेमणूक करणे गरजेचे होते; मात्र अपघाताचा तो दिवस वगळता दुसऱ्या दिवशी वाहतूक पोलीस नसल्याचे बघून नागरिकांनी वाहतूक शाखेच्या सुस्त कारभारावर संताप व्यक्त करत शुक्रवारी सकाळी रास्ता रोको केला.
सेवाकुंज परिसरात चार ते पाच शाळा असल्याने या भागात वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी वाहतूक शाखेकडे शाळा व्यवस्थापन व परिसरातील नागरिकांनी यापूर्वी अनेकदा केली होती; मात्र बुधवारच्या दिवशी अपघाताची घटना आणि त्यानंतरदेखील त्याठिकाणी पोलीस नाही हे बघून नागरिकांचा पारा चढला आणि रास्ता रोको झाला. जर शुक्रवारी सकाळी वाहतूक पोलीस प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत असते तर रास्ता रोको झालाच नसता हे तितकेच खरे आहे. ज्या दिवशी अपघात घडला त्याच दिवशी वाहतूक शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन तत्काळ पोलीस कर्मचारी नेमणे गरजेचे होते, परंतु तसे झाले नाही. त्यामुळे वाहतूक शाखेची दिरंगाई आणि सुस्त कारभाराचे दर्शन या निमित्ताने झाले व त्यातून झालेल्या रास्ता रोकोला वाहतूक शाखाच जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दरम्यान, या झाल्याप्रकाराला वाहतूक शाखाच जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांनी केल्याने पोलीस आयुक्त या प्रकाराची कितपत दखल घेतात याकडे नागरिकांचे लक्ष वेधले आहे.