...तर पुन्हा इन्स्पेक्टर राज
By Admin | Updated: February 5, 2017 22:47 IST2017-02-05T22:47:10+5:302017-02-05T22:47:29+5:30
चंद्रशेखर चितळे : ‘अर्थसंकल्प-२०१७’ चर्चासत्रात प्रतिपादन; लोकमत, महाराष्ट्र चेंबर्स, सीए इन्स्टिट्यूटचा सहभाग

...तर पुन्हा इन्स्पेक्टर राज
नाशिक : केंद्र सरकारने आयकर अधिकाऱ्यांना असलेल्या अधिकाराच्या कक्षा वाढवल्याने देशातील इन्स्पेक्टर राज वाढणार असून, करदात्यांसोबत गैरप्रकार वाढण्याची भीती ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ तथा सनदी लेखापाल चंद्रशेखर चितळे यांनी व्यक्त केली.
केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी सत्तेत येण्यापूर्वी इन्स्पेक्टर राज हद्दपार करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, नोटाबंदीच्या निर्णयामुुळे अपेक्षित प्रमाणात काळा पैसा बाहेर न आल्याने विचलित झालेल्या सरकारने आयकर अधिकाऱ्यांना अधिक सूट दिल्याचे ते म्हणाले. शंकराचार्य संकुल येथील डॉ. कूर्तकोटी सभागृहात ‘लोकमत’सह महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चर (एमएसीसीआयए), सीए इन्स्टिट्यूटची नाशिक शाखा व कर सल्लागार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अर्थसंकल्प-२०१७’ चर्चासत्रात ते बोलत होते. व्यासपीठावर कर सल्लागार अॅड. विद्याधर आपटे, एमएसीसीआयएचे वरिष्ठ उपाध्यक्ष संतोष मंडलेचा उपाध्यक्ष अनिल लोढा, सीए इन्स्टिट्यूट नाशिकचे अध्यक्ष रवी राठी, उपाध्यक्ष विकास हासे, कर सल्लागार संघटनेचे अध्यक्ष अनिल चव्हाण आदि उपस्थित होते. याप्रसंगी चितळे यांनी अर्थसंकल्पाचे विश्लेषण करताना हा दीर्घकालीन वाटचालीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अर्थसंकल्प असल्याचे सांगतानाच सध्याच्या परिस्थितीत अर्थसंकल्पातील तरतुदींचा शीघ्र परिणाम दिसणार नसल्याचे स्पष्ट केले. सरकारचे विविध प्रत्यक्ष तथा अप्रत्यक्ष कराचे प्रमाण कमी करण्याचे प्रयत्न असून, २०१९च्या निवडणुकीच मोठ्या प्रमात करात कपात होण्याचे भाकीतही त्यांनी यावेळी वर्तवले. सरकारचे करविषयीचे धोरण स्थिर करण्याचे नियोजन असून, करदात्याने भांडवली नफा म्हणून जाहीर केलेले उत्पन्नच करपात्र उत्पन्न धरण्याची तरतूद या सरकारने परिपत्रकाच्या माध्यमातून केली असल्याचे स्पष्ट करतानाच येत्या काळात करातून मिळणारे उत्पन्नही वाढण्याची शक्यता चितळे यांनी व्यक्त केली. सूत्रसंचालन जयप्रकाश गिरासे यांनी केले. (प्रतिनिधी)