शिंदेनगर परिसरात चोरट्यांचा उपद्रव
By Admin | Updated: November 8, 2015 23:24 IST2015-11-08T23:21:37+5:302015-11-08T23:24:05+5:30
शिंदेनगर परिसरात चोरट्यांचा उपद्रव

शिंदेनगर परिसरात चोरट्यांचा उपद्रव
पंचवटी : मखमलाबाद शिवारातील शिंदेनगर परिसरात गेल्या आठवडाभरापासून भुरट्या चोरट्यांचा उपद्रव वाढल्याने नागरिक त्रस्त झाले असून, या भुरट्या चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नागरिकांना रात्रीच्या वेळी जागरण करून चोरट्यांवर नजर ठेवावी लागत आहे.
परिसरात गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून रात्रीच्या वेळी भुरटे चोर येऊन घरातील खिडकीजवळ ठेवलेले कपडे, मोबाइल फोन व अन्य वस्तू चोरी करून नेत आहेत. मात्र गेल्या आठवडाभरापासून या भुरट्या चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याने नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. पोलिसांनी या भागात गस्त वाढवावी, अशी मागणी केली; मात्र पोलीस प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांनी स्वत:च या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याच्या इराद्याने परिसरात रात्रीची गस्त सुरू केली आहे. सध्या शिंदेनगर भागातील चाळीस ते पन्नास नागरिक स्वत: रात्रभर आपल्या परिसरात गस्त घालून भुरट्या चोरट्यांना पळवून लावण्याचे काम करीत आहेत. तीन ते चार दिवसांपूर्वी या नागरिकांनी एका चोरट्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
शिंदेनगर भागात मोठी नागरी वसाहत असून या भागात वारंवार चोऱ्या होत असल्याने नागरिकांना दिवसा घर बंद करून बाहेर जाणे मुश्किल झाले आहे. भुरट्या चोरट्यांने पोलिसांसमोर आव्हान उभे केले असल्याचे बोलले जात आहे.