निमगाव जिल्हा बॅँक शाखेत चोरी
By Admin | Updated: September 14, 2015 22:48 IST2015-09-14T22:47:48+5:302015-09-14T22:48:51+5:30
गुन्हा दाखल : १३ लाख ५१ हजार ८७० रुपये लंपास

निमगाव जिल्हा बॅँक शाखेत चोरी
मालेगाव : तालुक्यातील निमगाव येथे अज्ञात चोरट्यांनी जिल्हा बॅँकेत धाडसी चोरी करत १३ लाख ५१ हजार ८७० रुपये लंपास केले असून, परिसरात खळबळ उडाली आहे.
गेल्या शनिवारी व रविवारी दोन दिवस सुटी असल्याने जिल्हा बॅँक बंद होती. याची संधी साधून पाळत ठेवलेल्या अज्ञात चोरट्यांनी ही चोरी केली. बॅँकेचे व्यवस्थापक सुभाष देवरे यांनी तालुका पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला.
दोन दिवसांपूर्वी अज्ञात चोरट्यांनी जिन्यातून प्रवेश करून बॅँकेचे ग्रील व लाकडी दरवाजाचा कुलूप कटरच्या साह्याने तोडून बॅँकेत शिरले. कॅशिअर कॅबिनमधील मोठी लोखंडी तिजोरी गॅस कटरने उघडून त्यातील १३ लाख ५१ हजार ८७० रुपये घेऊन फरार झाले. शेजारील सोसायटीच्या वॉचमनने खिडकी तुटलेली पाहिली. तसेच बॅँकेचा जिना आतून होता. गेल्या शनिवारी साडेतीन वाजता व्यवस्थापक देवरे यांनी बॅँक व तिजोरी बंद केलेली होती.
दरम्यान, हा प्रकार लक्षात येताच ग्रामस्थांची एकच गर्दी झाली. बॅँकेचे अधिकारी दाखल झाले. त्यांनी
तत्काळ पोलिसांशी संपर्क साधून
झालेल्या घटनेची माहिती दिली. पोलीस निरीक्षक विजय सोनवणे, उपअधीक्षक अशोक नखाते यांच्यासह पोलीस
फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. नाशिकहून ठसे तज्ज्ञ व श्वान पथकही आणण्यात आले.
पोलीस चोरट्यांच्या मागावर असून, लवकरच त्यांना अटक करू, असे पोलीस निरीक्षक सोनवणे यांनी सांगितले.
दरम्यान, चोरट्यांनी ग्रामीण भागाकडे आपला मोर्चा वळविल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामीण भागातील लोकांकडून केली जात आहे. (प्रतिनिधी)