रंगभूमीवर घराण्याचा नव्हे, कलेचा विचार

By Admin | Updated: June 5, 2016 22:32 IST2016-06-05T22:27:50+5:302016-06-05T22:32:45+5:30

रंगभूमीवर घराण्याचा नव्हे, कलेचा विचार

Theater is not about the house, but the idea of ​​art | रंगभूमीवर घराण्याचा नव्हे, कलेचा विचार

रंगभूमीवर घराण्याचा नव्हे, कलेचा विचार

नाशिक : साठच्या दशकात महिला रंगभूमीवर काम करीत असत; मात्र समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन संकुचित होता. आपल्यासारख्या किर्लोस्कर घराण्यातील महिलेने साधे पेंटर असलेल्या रंगकर्मी बाबूराव सावंत यांच्याबरोबर काम करणे अनेकांना खटकले; मात्र रंगभूमीवर सगळे कलावंत सारखेच असल्याने आपण कधीच भेदाभेद मानला नाही, अशी आठवण ज्येष्ठ रंगकर्मी नीलमताई किर्लोस्कर यांनी सांगितली.
सार्वजनिक वाचनालयाच्या ‘ऐसपैस गप्पा’ या उपक्रमात आज ज्येष्ठ रंगकर्मी व शिक्षण अभ्यासक नीलमताई किर्लोस्कर यांनी आपल्या अनेक आठवणींना उजाळा दिला. मु. शं. औरंगाबादकर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात रंजना पाटील यांनी त्यांची मुलाखत घेत त्यांना बोलते केले. फलकावरील ‘शिक्षणतज्ज्ञ’ हे विशेषण पाहून त्यांनी प्रारंभीच आपण ‘शिक्षणतज्ज्ञ’ नव्हे, तर ‘शिक्षणप्रेमी’ असल्याचा खुलासा केला. लहानपणापासून नाटकाची आवड असल्याने शाळा, महाविद्यालय स्तरावर अभिनय केला. विवाहानंतर नाशिकला आल्यावर कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी ‘आॅथेल्लो’ नाटकात काम करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यांच्या आग्रहाला नकार देणे शक्य नसल्याने आपण भूमिका स्वीकारली.
वसंतराव जहागिरदार, दादा नाडगौडा, बाबूराव सावंत हे रंगकर्मी तेव्हा काम करीत. साधे पेंटर असलेल्या बाबूरावांबरोबर नाटकात काम करीत असल्याबद्दल अनेकांनी पतीकडे नाराजी व्यक्त केली. त्यांनी मात्र नाटकात काम करताना घराण्याचा विचार होत नाही, तर सगळे कलावंत एका पातळीवर असतात, असे सांगत आपली पाठराखण केली. आपल्या मनातही कधीच असा विचार आला नाही. पेठे हायस्कूलमध्ये रात्री उशिरापर्यंत तालमी चालत; पण कधीच भीती वाटली नाही. याशिवाय विजया मेहतांबरोबरच्या आठवणीही त्यांनी उपस्थितांना सांगितल्या. रसिकांच्या आग्रहावरून नाट्यपदही गाऊन दाखवले.
सावानाचे उपाध्यक्ष नरेश महाजन यांनी प्रास्ताविक केले. कार्यवाह मिलिंद जहागिरदार यांनी परिचय करून दिला. सुरेश गायधनी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला रसिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Theater is not about the house, but the idea of ​​art