नाशिकसह राज्यातील स्मार्ट सिटी मिशनला पुन्हा मुदतवाढ
By संजय पाठक | Updated: June 30, 2024 18:16 IST2024-06-30T18:15:03+5:302024-06-30T18:16:18+5:30
मार्च २०२५ पर्यंत मुदत; जुनीच कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

नाशिकसह राज्यातील स्मार्ट सिटी मिशनला पुन्हा मुदतवाढ
नाशिक : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानाची मुदत ३० जून रोजी संपत असतानाच शासनाने आता नाशिकसह सर्व स्मार्ट सिटी अभियानाला पुन्हा मुदतवाढ दिली आहे. नवीन मुदतवाढ मार्च २०२५ पर्यंत असली तरी त्यात कोणतीही नवीन कामे घेता येणार नसून त्यात केवळ प्रलंबित कामेच पूर्ण करण्यात येणार आहेत.
केंद्रातील भाजप सरकारने देशातील शंभर शहरांमध्ये स्मार्ट सिटी अभियान राबवण्याचा निर्णय घेतला. नाशिक शहराचा दुुसऱ्या टप्प्यात या अभियानात समावेश झाला. राज्य केंद्र आणि राज्य शासन यांच्याकडून ८० टक्के तर स्थानिक महपाालिकांना २० टक्के निधी द्यावा लागत होता. २०१७ मध्ये केंद्रशासनाने स्मार्ट सिटी अभियान राबवण्याचा निर्णंय घेतला. पाच वर्षे कालावधी संपल्यानंतर आत्तापर्यंत तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती.
गेल्या वर्षी जुन महिन्यात या अभियानातची मुदत संपताना एक वर्षे कालावधी वाढवून देण्यात आला. मात्र, केवळ आयटी क्षेत्राशी संबंधीत नवी कामे घेता येतील अशी अट हेाती. दरम्यान, आज मुदत संपत असताना केंद्रशासनाने पुन्हा मार्च २०२५ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.