काेष्टीवर ‘नेम’ धरणाऱ्याचा नगरमध्ये ‘गेम’ दोघांना नगरमध्ये अटक : गोळीबाराचे कारण उलगडणार
By श्याम बागुल | Updated: April 22, 2023 19:11 IST2023-04-22T19:10:57+5:302023-04-22T19:11:42+5:30
प्रत्यक्ष गोळीबार करणारा हाती लागल्याने खऱ्या अर्थाने या गुन्ह्यामागच्या कारणाचा उलगडा होण्यास मदत होणार आहे.

काेष्टीवर ‘नेम’ धरणाऱ्याचा नगरमध्ये ‘गेम’ दोघांना नगरमध्ये अटक : गोळीबाराचे कारण उलगडणार
नाशिक : भाजपच्या माथाडी कामगार युनियनचा जिल्हाध्यक्ष तथा सराईत गुन्हेगार राकेश काेष्टी याच्यावर गाेळ्या झाडणारा मुख्य संशयित सागर पवार व पवन पुजारी या दाेघांना शनिवारी (दि. २२) पहाटे नाशिकच्या गुंडाविराेधी पथकाने नगर जिल्ह्यात अटक केली आहे. आत्तापर्यंत पोलिसांनी या गुन्ह्यात १४ जणांना अटक केली असली तरी, प्रत्यक्ष गोळीबार करणारा हाती लागल्याने खऱ्या अर्थाने या गुन्ह्यामागच्या कारणाचा उलगडा होण्यास मदत होणार आहे.
सिडकाेतील बाजी प्रभू नगरमध्ये देवदर्शनासाठी जाणाऱ्या राकेश काेष्टी याच्यावर रविवारी (दि. १६) सकाळी गाेळ्या झाडण्यात आल्या हाेत्या. यात त्याला पोटात व मणक्यात दाेन गाेळ्या लागल्याने त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत. भर वस्तीत घडलेल्या या गोळीबाराच्या घटनेने शांतताप्रिय नागरिकांच्या मनात धस्स होऊन पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
शहरातील गुन्हेगारी टोळीच्या वर्चस्ववादातून ही घटना घडल्याचा निष्कर्ष काढून अंबड पाेलिसांनी अवघ्या काही तासांतच पंचवटीतून काही संशयितांना ताब्यात घेतले होते. नियोजनबद्धपणे व पाळत ठेवून करण्यात आलेल्या या गोळीबाराच्या घटनेत जवळपास १० ते १५ सराईत सहभागी असल्याची खबर पोलिसांना मिळाल्याने टप्प्याटप्प्याने त्यांनी १२ जणांना अटक केली. परंतु कोष्टीवर जवळून नेम धरून गोळीबार करणारा सागर पवार व दुचाकीचालक पवन पुजारी हे मात्र घटना घडल्यानंतर लगेचच फरार झाले होते.