सांस्कृतिक संचलनालयाच्या 'लखलख चंदेरी' कार्यक्रमाला रसिकांची दाद
By धनंजय रिसोडकर | Updated: October 26, 2022 14:21 IST2022-10-26T14:21:02+5:302022-10-26T14:21:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया, गगन सदन तेजोमय, प्रभाती सूर रंगले अशा एकाहून एक ...

सांस्कृतिक संचलनालयाच्या 'लखलख चंदेरी' कार्यक्रमाला रसिकांची दाद
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया, गगन सदन तेजोमय, प्रभाती सूर रंगले अशा एकाहून एक सरस भाव गीतांपासून भक्ती गीतांपर्यंत ते अगदी 'रेशमाच्या रेघांनी लाल काळया धाग्यांनी' या लावणी पर्यंत आणि मराठीच्या श्रेष्ठ कवींच्या काव्याचे सादरीकरण करत लखलख चंदेरी हा कार्यक्रम रंगला.
राज्य शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने कालिदास कलादालनात झालेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमात प्रख्यात गायक संगीतकार कौशल इनामदार आणि कलाकारांनी गाण्यांचे आणि कवितांचे अप्रतिम सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया या गीताच्या सादरीकरणास झाल्यापासूनच कार्यक्रमाने रसिक मनांचा ताबा घेतला. कानडा राजा पंढरीचा, सौभाग्य लक्ष्मी बारम्मा, शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले, मन उधाण वाऱ्याचे, दे ना रे पुन्हा पुन्हा गगन झुला, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा अशा एकाहून एक सरस गीतांचे सादरीकरण करण्यात आले. गाण्यांचे सादरीकरण कौशल इनामदार यांच्यासह संजीव चिमलगी, मधुरा कुंभार पाध्ये, आणि केतन पटवर्धन यांनी केले. तर दीपक करंजीकर यांनी कविवर्य कुसुमाग्रज, मंगेश पाडगावकर, शांता शेळके, वसंत बापट या कवींच्या एकेका काव्याचे सादरीकरण करीत रसिकांची दाद मिळवली. अस्मिता पांडे यांनी कार्यक्रमाचे अप्रतिम निवेदन केले. प्रारंभी सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष रवींद्र कदम, कार्याध्यक्ष सुनील ढगे, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, डॉ. मृणाल पाटील यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करण्यात आले. उपस्थित सर्व प्रमुख कलाकारांना बागेश्री वाद्यवृंदाच्या चारुदत्त दीक्षित आणि सहकाऱ्यांनी सन्मानित केले.