इगतपुरी तालुक्यात संततधारेमुळे त्रिंगलवाडी, तळोशी बंधारे फुल्ल

By Admin | Updated: July 28, 2014 00:42 IST2014-07-27T23:00:14+5:302014-07-28T00:42:38+5:30

वाकी खापरी धरण : प्रथमच पाणी साठल्याने अनेक गावांना वेढा

Thanksgiving in Igatpuri taluka, Tringalwadi, Taloshi Bandhare Ful | इगतपुरी तालुक्यात संततधारेमुळे त्रिंगलवाडी, तळोशी बंधारे फुल्ल

इगतपुरी तालुक्यात संततधारेमुळे त्रिंगलवाडी, तळोशी बंधारे फुल्ल

घोटी : इगतपुरी तालुक्यात गेल्या आठवड्यापासून होणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील त्रिंगलवाडी आणि तळोशी ही लहान साठवण क्षमतेची बंधारे पूर्ण भरून वाहू लागली असून, दारणा आणि
भावली धरणक्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे ही धरणे ४५ टक्के भरली आहेत. पावसाचे प्रमाण अजून पंधरा दिवस असेच कायम राहिल्यास ही दोन्ही धरणे पूर्णपणे भरतील असा विश्वास पाटबंधारे विभागाचे अधिकारी एस. के. मिसाळ यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान तालुक्यातील वाकी खापरी या नवीन धरणात या वर्षापासून पाणी साठविण्यात आले असून, या धरणात दहा टक्के पाणी साठा झाल्याने धरणाच्या फुगवट्याने परिसरातील अनेक गावांना वेढा दिला आहे.
पावसाचे माहेरघर अशी ओळख असणाऱ्या इगतपुरी तालुक्यालाही पावसाची दीड महिना प्रतीक्षा करावी लागली होती.त्यानंतर सुरू झालेल्या पावसाने अद्यापही उसंत न घेतल्याने नदी, नाले, बंधारे आणि धरणे यांच्या साठवणक्षेत्रात कमालीची वाढ झाली आहे. तालुक्यातील निम्म्याहून अधिक बंधारे पूर्ण भरण्याच्या मार्गावर असून, यातील त्रिंगलवाडी आणि तळोशी ही बंधारे काठोकाठ भरून वाहू लागली, तर तालुक्यासह मराठवाड्याच्या सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची मदार असलेली दारणा आणि भावली धरणातही सुमारे चांगला पाणीसाठा झाला असल्याने तालुक्यातील जनता सुखावली आहे.
पंधरा दिवसांपासून होणाऱ्या संततधारेमुळे खरिपाच्या विशेषत: भाताच्या लागवडीला वेग आल्याचे चित्र तालुक्यात पाहण्यास मिळते.
दरम्यान, कडवा धरणक्षेत्र आणि पूर्व भागात अद्यापही दमदार पाऊस न झाल्याने या भागातील एकमेव कडवा धरणातील साठा सर्वांत कमी आहे. (वार्ताहर)

Web Title: Thanksgiving in Igatpuri taluka, Tringalwadi, Taloshi Bandhare Ful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.