वडाळ्याच्या महिलांचा थाळीनाद मोर्चा
By Admin | Updated: October 13, 2015 00:15 IST2015-10-13T00:13:54+5:302015-10-13T00:15:49+5:30
जिल्हाधिकारी कार्यालय : रेशन दुकानदारांच्या मनमानी कारभाराचा निषेध

वडाळ्याच्या महिलांचा थाळीनाद मोर्चा
नाशिक : वडाळागावातील रेशन दुकानदारांकडून महिलांना केली जाणारी अरेरावी थांबवावी व दुकानदारांचे परवाने रद्द करून मक्तेदारी संपुष्टात आणावी, केशरी शिधापत्रिकाधारकांना अन्नसुरक्षा कायद्याचा लाभ द्यावा, अशा एक ना अनेक प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी व रेशन दुकानदारांच्या तक्रारींकडे लक्ष वेधण्यासाठी शेकडो महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर थाळीनाद मोर्चा काढला.
प्रभाग क्रमांक ५४च्या नगरसेवक व स्थायी समिती सदस्य रशिदा शेख यांच्या नेतृत्वाखाली प्रभागातील महेबूबनगर, रंगरेजमळा, गुलशननगर, सावित्रीबाई फुले झोपडपट्टी, सादिकनगर, पिंगुळबाग, अण्णा भाऊ साठेनगर परिसरातील रहिवाशांनी सोमवारी (दि.१२) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी जिल्हा पुरवठा विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासन व रेशन दुकानदारांच्या मनमानी कारभारांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती. बी. डी. भालेकर शाळेच्या मैदानावरून सकाळी अकरा वाजता मोर्चाला प्रारंभ झाला. शालिमार, मेहेर चौक मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला. दरम्यान, रशिदा शेख, इरफान शेख, प्रवीण जाधव, नाजमीन शेख आदिंच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
आॅगस्ट महिन्यात रेशन दुकानदारांच्या तक्रारींबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी यांना शेख यांनी शिष्टमंडळासह निवेदन दिले होते; मात्र त्याबाबत कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. दोन महिन्यांचा कालावधी उलटूनदेखील रेशन दुकानदारांच्या वागणुकीमध्ये कु ठलाही बदल झाला नाही. परिणामी आज मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.