चांदवड येथील ‘तो’ तोतया डॉक्टर फरार
By Admin | Updated: March 3, 2017 00:38 IST2017-03-03T00:38:27+5:302017-03-03T00:38:42+5:30
सदरचा सीताराम हा तोतया डॉक्टर कालच्या प्रकारापासून फरार असून, त्याचा शोध घेतला जात आहे. तो बऱ्याच दिवसांपासून या उपजिल्हा रुग्णालयात असायचा असे नागरिकांकडून बोलले जात आहे.

चांदवड येथील ‘तो’ तोतया डॉक्टर फरार
चांदवड : येथील उपजिल्हा रुग्णालयातील तोतया डॉक्टर प्रकरणी चौकशी अधिकारी अनंत पवार यांनी गुरुवारी दिवसभर उपजिल्हा रुग्णालयात थांबून चौकशी केली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. मंदाकिनी बर्वे यांना गुरुवारपासून सक्तीच्या सुट्टीवर पाठविले आहे. त्यांच्या जागी नवीन अधीक्षकांची लवकरच नियुक्ती केली जाईल, असे सांगण्यात आले आहे.
वैद्यकीय अधीक्षक सौ. बर्वे यांच्यावर योग्य ती कार्यवाही होईल व ‘त्या’ तोतया डॉक्टर शोध घेतला जाईल. सदरचा सीताराम हा तोतया डॉक्टर कालच्या प्रकारापासून फरार असून, त्याचा शोध घेतला जात आहे. तो बऱ्याच दिवसांपासून या उपजिल्हा रुग्णालयात असायचा असे नागरिकांकडून बोलले जात आहे.
येथील उपजिल्हा रुग्णालयातील तोतया डॉक्टर व वैद्यकीय अधीक्षक यांच्यावर कार्यवाही करावी, अशी मागणी चांदवड - देवळा मतदारसंघाचे आमदार डॉ.राहुल अहेर यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना निवेदनाद्वारे केली आहे तर चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालय व ट्रामा केअर सेंटरवर शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून वैद्यकीय उपकरणे बसविलेली आहे. दि. १ मार्च रोजी चांदवड उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या खुर्चीवर बसून एक तोतया डॉक्टर रुग्णालयात वैद्यकीय उपचाराकरिता आलेल्या रुणांची तपासणी करून केस पेपरवर औषधे लिहून देत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सदर बाब वैद्यकीय क्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असून, चुकीच्या औषधोपचारामुळे एखाद्या रुग्णावर जीव गमावण्याची वेळ येऊ शकते. रुग्णकल्याण समितीचे सदस्य प्रशांत ठाकरे यांनी या चौकशीसाठी आलेले चौकशी अधिकारी पवार यांना निवेदन देऊन या घटनेची योग्य चौकशी व्हावी तसेच चांदवड उपजिल्हा रुग्णालयात भूलतज्ज्ञ नाही ते द्यावेत तसेच विजेची उपकरणे बंद असून, ती सुरू करण्याची मागणी करण्यात आल्या आहेत. (वार्ताहर)