आचारसंहितेत अडकणार ‘ग्रंथयात्रा’

By Admin | Updated: September 10, 2016 01:00 IST2016-09-10T00:59:20+5:302016-09-10T01:00:19+5:30

महापालिका : ग्रंथयोग काही जुळेना, पदाधिकारी संभ्रमात

Texmology | आचारसंहितेत अडकणार ‘ग्रंथयात्रा’

आचारसंहितेत अडकणार ‘ग्रंथयात्रा’

नाशिक : दसरा-दिवाळीदरम्यान दि. १४ ते २३ आॅक्टोबर या कालावधीत महापालिकेच्या वतीने ग्रंथयात्रा भरविण्याची तयारी सुरू असली तरी त्या कालावधीत पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने ग्रंथयात्रा अडचणीत सापडली आहे. गेल्या वर्षभरापासून ग्रंथयात्रा भरविण्याचे नियोजन केले जात आहे परंतु ग्रंथयोग जुळून येण्यात अडथळे निर्माण होत आहेत.
मागील वर्षी महापौर अशोक मुर्तडक व उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी अंदाजपत्रकात ग्रंथयात्रेसाठी खास २५ लाख रुपयांची तरतूद केलेली होती. त्यानुसार, मे महिन्यात सुटीच्या काळात दहा दिवसांसाठी ग्रंथयात्रा भरविण्याचे नियोजन होते. परंतु दुष्काळी स्थितीमुळे निर्णय स्थगित ठेवण्यात आला होता. त्यानंतर आता ग्रंथयात्रा दि. १४ ते २३ आॅक्टोबर या कालावधीत भरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी गोल्फ क्लब मैदानावर भव्य वॉटरप्रूफ डोम उभारला जाणार आहे. सुमारे दोनशे प्रकाशक व ग्रंथविक्रेत्यांना त्यासाठी निमंत्रित करण्याचे ठरविण्यात आले आहे. आता डोम व अन्य व्यवस्थेसाठी निविदाप्रक्रिया राबविण्याची तयारी सुरू झाली असतानाच ग्रंथयात्रेवर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक आचारसंहितेचे सावट पुढे उभे ठाकले आहे.
पदवीधर मतदारसंघाची निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी दीड महिना आचारसंहिता लागू राहणार आहे. निवडणुकीची आचारसंहिता १५ आॅक्टोबरनंतर केव्हाही लागण्याची शक्यता असल्याने ग्रंथयात्रेवरही गंडांतर येऊ शकते. त्यामुळे पदाधिकाऱ्यांकडून आचारसंहितेबाबत चाचपणी केली जात असून त्यानंतरच निविदाप्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निविदाप्रक्रिया राबविण्यासाठी किमान महिनाभराचा कालावधी जाणार आहे. त्यानंतर मंजुरीचे सोपस्कार पार पडतील. तोपर्यंत आचारसंहितेचा कालावधी येऊन ठेपल्यास ग्रंथयात्रा भरविणे अवघड होऊन बसण्याची भीती पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Texmology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.