तिसऱ्या पर्वणीला कसोटी
By Admin | Updated: September 14, 2015 23:29 IST2015-09-14T23:18:22+5:302015-09-14T23:29:13+5:30
पुन्हा पेच : शाहीस्नानानंतर तीनही आखाडे रामकुंडावर थांबणार

तिसऱ्या पर्वणीला कसोटी
संदीप झिरवाळ,पंचवटी
सिंहस्थ कुंभमेळ्यातील शेवटच्या तिसर्या पर्वणीला आखाड्याच्या परंपरेनुसार शाहीस्नानाचा क्रम बदलत असल्याने शुक्रवारी (दि.१८) रोजी होणार्या तिसर्या शाहीस्नानाला प्रथम निर्माेही, मध्यभागी दिगंबर आणि शेवटी निर्वाणी असे आखाडे शाहीस्नान करणार आहेत. शाहीस्नान झाल्यानंतर परतीचा क्रम बदलत असल्याने तीनही आखाडे रामकुंडावर थांबणार असल्याने तिसर्या पर्वणीच्या दिवशी प्रशासनाची कसोटी लागणार आहे.
आखाड्यांच्या शाहीस्नान परंपरेनुसार शुक्रवारी होणार्या तिसर्या शाहीस्नानाच्या दिवशी निर्माेही आखाडा अग्रभागी राहील. त्यानंतर दिगंबर आखाडा मिरवणुकीच्या मध्यभागी राहात असल्याने दिगंबर आखाड्याचे महंत रामकुंडावर दाखल झाल्यानंतर दिगंबरचे महंत शाहीस्नान करून तेदेखील रामकुंडावरच थांबतील आणि दिगंबरचे स्नान आटोपल्यानंतर निर्वाणी आखाडा स्नानासाठी रामकुंडावर दाखल होईल आणि परतताना निर्वाणी आखाडा पुढे राहील. त्यानंतर मध्यभागी दिगंबर आणि शेवटी निर्माेही आखाडा राहणार आहे. दरम्यान, या कालावधीत भाविकांनी स्नानासाठी शिरकाव केल्यास काही गोंधळ होण्याची दाट शक्यता आहे. निर्माेही व दिगंबरचे साधू-महंत हे निर्वाणी आखाड्याचे स्नान होईपावेतो रामकुंडावरच काही काळासाठी थांबणार असल्याने प्रशासनालादेखील भाविकांना तीनही आखाड्यांचे स्नान आटोपत नाही तोपर्यंत सोडण्याची खबरदारी घ्यावी लागणार आहे.
थांबण्यासाठी जागा निश्चित करावी लागणार
शाहीस्नानासाठी मिरवणुकीत अग्रभागी असणार्या निर्माेही व मध्यभागी असलेल्या दिगंबर तसेच शेवटी येणार्या निर्वाणी आखाडे स्नानानंतर रामकुंडावर काहीकाळ थांबणार असल्याने या वेळेत केवळ आखाड्यांच्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या भाविकांनाच स्नान करता येईल. त्यामुळे गेल्या दोन पर्वणीत ज्याप्रमाणे भाविकांनी मिरवणुकीत शिरकाव केला होता तसा शिरकाव भाविकांनी करू नये यासाठी प्रशासनाला लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.
सुरुवातीला निर्माेही व दिगंबर आखाड्यांचे स्नान झाल्यानंतर आखाड्यांचे महंत, हनुमान निशाण, मंत्री, पदाधिकारी, वाद्यपथक, रामकुंडावर थांबून राहणार असल्याने साधू-महंतांना थांबण्यासाठी जागा निश्चित करावी लागणार आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यातील दोन शाहीस्नानाच्या पर्वण्या शांततेत पार पडल्या. परंतु शाहीस्नानापूर्वी समन्वय साधण्यासाठी मेळा व पोलीस प्रशासनाने साधू-महंतांची बैठक घेऊन चर्चा करणे गरजेचे होते. दोन पर्वण्या झाल्या तरी प्रशासनाने बैठक घेतली नाही. तिसर्या पर्वणीला प्रशासनाची कसोटी लागणार असल्याने समन्वय साधण्यासाठी किमान तिसर्या पर्वणीपूर्वी बैठक घेणे गरजेचे ठरणार आहे.
- महंत राजेंद्रदास, निर्माेही आखाडा