ब्राह्मणगाव येथे बिबट्याची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:18 IST2021-09-07T04:18:15+5:302021-09-07T04:18:15+5:30
परिसरात गेल्या दोन तीन वर्षांपासून पाण्याच्या उपलब्धतेमुळे ऊस पीक लागवडीचे क्षेत्र वाढले असल्याने, बिबट्यांना लपण्यासाठी सोपी जागा उपलब्ध झाली ...

ब्राह्मणगाव येथे बिबट्याची दहशत
परिसरात गेल्या दोन तीन वर्षांपासून पाण्याच्या उपलब्धतेमुळे ऊस पीक लागवडीचे क्षेत्र वाढले असल्याने, बिबट्यांना लपण्यासाठी सोपी जागा उपलब्ध झाली आहे. मात्र, यामुळे शेतकऱ्यांना रात्री पहाटे उसांना किंवा अन्य पिकांना पाणी भरण्यासाठी जातांना भीती वाटत आहे.
या आधीही डोंगर परिसरातील शिवारात तीन ते चार बिबटे होते. त्यांनी अनेक कुत्री, शेळ्या, मेंढ्या फस्त केल्या आहेत. याबाबत वनविभागाने मेंढ्यांचे नुकसानीचे पंचनामेही केले होते. मात्र, आता या बिबट्यांनी शिवार बदलल्याने या परिसरात भीती निर्माण झाली असून, अद्याप मोठे नुकसान झाले नसले, तरीही त्याची दहशत मात्र कायम आहे. परिसरातील बऱ्याच शेतकऱ्यांनी बिबट्याचे दर्शन झाल्याचे सांगितले, तसेच मोरांचे ही दर्शन तर नेहमीच होत असल्याचे सांगत, काही शेतकऱ्यांनी शेतात बिबट्याचे पावलाचे ठसे ही पाहिल्याचे सांगितले आहे.
कोट.....
सद्या बिबट्यांची संख्या वाढत असल्याने, ही नैसर्गिकदृष्टया समाधानाची बाब असली, तरी वनविभागाने कोणत्या कोणत्या गावांना बिबटे आहेत, कोणत्या परिसरात, शिवारात, तसेच त्यांची संख्या यावर सतत लक्ष ठेऊन सर्वांना याबाबत सूचित करणे गरजेचे आहे, जेणेकरून शेतात राहणारे शेतकरी किंवा शेतमजूर याबाबत दक्ष राहून पुढचा धोका टळू शकतो. आमच्या या शिवारात मी प्रत्यक्ष बिबट्या फिरताना पहिला असून, त्यामुळे पिकांना पाणी भरण्यासाठी जातांना खूप भीती वाटत आहे. याची वनविभागाने वेळीच दखल घ्यावी.
- गौरव सुभाष अहिरे, ऊस उत्पादक शेतकरी, ब्राह्मण गाव.