अतिक्रमण काढल्याने तणाव
By Admin | Updated: April 17, 2015 23:43 IST2015-04-17T23:38:53+5:302015-04-17T23:43:21+5:30
राजीवनगर झोपडपट्टी : दगडफेकीचा प्रयत्न; दोन पोलीस कर्मचारी जखमी; २० आंदोलक ताब्यात

अतिक्रमण काढल्याने तणाव
इंदिरानगर : अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या राजीवनगर झोपडपट्टीत सकाळच्या सुमारास अतिक्रमण विरोधी मोहीम राबविल्यानंतर संतप्त रहिवाशांनी पोलीस ठाण्यासमोर दगडफेक आणि वाहनांची तोडफोड करण्याचा प्रयत्न केल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलीस ठाण्यावर चाल करून आलेल्या सुमारे पाचशे ते सहाशेच्या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. याप्रकरणी पोलिसांनी सुमारे वीस आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
राजीवनगर येथे सकाळच्या सुमारास अतिक्रमण काढण्यात आल्यानंतर सायंकाळी परिसरात सुमारे पाचशे ते सहाशेचा जमाव जमला. संतप्त रहिवासी प्रचंड घोषणाबाजी करीत इंदिरानगर पोलीस ठाण्यासमोर आले. त्यांनी पोलीस प्रशासनाला खुले आव्हान देत परिसरातील गाड्या पाडून टाकल्या. काहींनी दगडफेक करण्याचाही प्रयत्न केल्याने क्षणात तणाव निर्माण झाला. यावेळी पोलिसांची जादा कुमक मागविण्यात आल्यानंतर पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी लाठीमार केला. यावेळी एकच धावपळ उडाली. यात दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाले.
यावेळी पोलिसांनी पीपल्स रिपाइंचे शशिकांत उन्हवणे यांच्यासह वीस जणांना ताब्यात घेतले. या घटनेनंतर राजीवनगरला पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला.
प्रारंभी सकाळच्या सुमारास राजीवनगर झोपडपट्टीलगतच्या शंभर फुटी रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आले होते. सकाळी दहा वाजेच्या सुमारास महापालिकेचे अतिक्रमण पथक पोलीस फौजफाट्यासह राजीवनगर येथे दाखल झाले होते. अतिक्रमण पथक येताच झोपडपट्टीतील नागरिक जमा होऊन त्यांनी अतिक्रमणाला विरोध दर्शविला. परंतु यापूर्वीच लाल खुणा करूनही जे अतिक्रमण काढले नाही ते अतिक्रमण काढणार असल्याची समजूत काढण्यात आली. यावेळी काही नागरिकांनी आम्हाला काही तासांची मुदत द्या, असे सांगितल्यानंतर पालिकेने त्यांना तीन तासांची मुदत दिली. या तीन तासांत अनेकांनी अतिक्रमण काढून घेतले. यावेळी सुमारे ८० पत्र्यांचे शेड नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने काढून घेतले.
मात्र, ज्यांनी अतिक्रमण काढूले नाही, असे पत्र्याचे शेड व पक्या बांधकामांवर अखेर जेसीबीचा पंजा चालविण्यात आला. या मोहिमेनंतर परिसरातील नागरिकांनी प्रशासनावर आरोप करीत रस्त्यावरच ठाण मांडले होते. त्यामुळे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (वार्ताहर)