मालेगावी हाणामारीने तणाव
By Admin | Updated: February 15, 2017 00:55 IST2017-02-15T00:55:00+5:302017-02-15T00:55:17+5:30
परस्पर विरोधात गुन्हे दाखल : दगडफेक, पोलीस बंदोबस्तात वाढ

मालेगावी हाणामारीने तणाव
मालेगाव : येथे दोन गटांत झालेल्या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. यात दोन्ही गटांतील दोन जण जखमी असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काल रात्री तालुक्यातील जळगाव चोंढी गावाजवळ पिकअप अडवून दोघा जणांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी गोवंश रक्षा समितीचे मच्छिंद्र शिर्के, सुभाष मालू व अन्य तिघा जणांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी शेख फारूक शेख शकील या जखमी झालेल्या तरुणाने तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. शेख फारूक व शेख फरीद शेख अब्दुल (दोघे, रा. इस्लामपुरा) हे मनमाडकडून पिकअप (क्र. एमएच १७ टी ७९०५) हिच्यातून जनावरे घेऊन येत असताना जळगाव चोंढी गावाजवळ शिर्के, मालू व अन्य तिघा जणांनी वाहन अडवून त्यांनी लाकडी दांडक्याने मारहाण करून पुलावरून खाली फेकून देत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पुढील तपास तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर हे करीत आहेत. दरम्यान, रात्री घडलेल्या या घटनेचे पडसाद दुसऱ्या दिवशी झालेल्या हाणामारीत उमटले. विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री व गोवंश रक्षा समितीचे पदाधिकारी मच्छिंद्र शिर्के यांच्या वाहनावर अज्ञात टोळक्याने दगडफेक करून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. शिर्के यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर संतप्त जमावाने येथील जुन्या आग्रा रोडवर रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांची समजूत काढली. मंगळवारी ११ वाजेच्या सुमारास गोवंश रक्षा समितीचे शिर्के हे त्यांच्या चारचाकी वाहनाने (क्र. एमएच ३९ - ३२४) मोसमपुलाकडे येत असताना अज्ञात २५ ते ३० जणांनी त्यांचे वाहन अडविले. वाहनाच्या सर्व काचांवर दगडफेक करत वाहनाचे मोठे नुकसान केले. यानंतर जमावाने रास्ता रोको आंदोलन केले. अज्ञात हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी केली. अपर पोलीस अधीक्षक राकेश ओला, पोलीस उपअधीक्षक गजानन राजमाने यांनी घटनास्थळी धाव घेऊन संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर जमावाने आंदोलन मागे घेतले.
दरम्यान, मनमाडकडून मालेगावकडे कत्तलीच्या हेतूने पिकअप गाडीत जनावरे घेऊन येणाऱ्या दोघा जणांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी गोवंश रक्षा समितीचे सुभाष मालू यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी ११ जनावरे व पिकअप असा दोन लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पुढील तपास तालुका पोलीस करीत आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. राज्य राखीव दलासह शीघ्रकृती दल व बाहेरगावांहून पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे. (प्रतिनिधी)