साधुग्राममध्ये जागा वाटपावरून तंटा
By Admin | Updated: July 9, 2015 00:05 IST2015-07-09T00:05:10+5:302015-07-09T00:05:25+5:30
साधू-महंत नाराज : प्रशासनाने झटकली जबाबदारी

साधुग्राममध्ये जागा वाटपावरून तंटा
नाशिक : तपोवनात साकारलेल्या साधुग्राममधील प्लॉट वाटपाची जबाबदारी आखाडा प्रमुखांवर सोपवून नामनिराळे राहू पाहात असलेल्या जिल्हा प्रशासनाविरुद्ध साधू-महंतांनी क्रोध प्रकट करीत वाटप केल्या जात असलेल्या जागा घेण्यास नकार दिला. अडगळीच्या व अडचणीच्या जागा देऊन प्रशासन अवमान करीत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात येऊन काही व्यक्ती पैसे घेऊन जागा वाटप करीत असल्याची तक्रार करण्यात आली. भर दुपारी सुरू झालेल्या या तंट्यामुळे तपोवनात धार्मिक तणाव निर्माण होत असल्याचे पाहून प्रशासनातील अधिकाऱ्यांनी धाव घेतली परंतु तोडगा काढण्यात अयशस्वी झाले.
साधुग्राममध्ये महापालिकेने १९३७ प्लॉट विकसित केले असून, त्याचे वाटप तीन आखाडे व साडेसहाशे खालशांना केले जात आहे. मुळात प्रशासनानेच ते प्रत्येक आखाडा, खालशांच्या मागणीनुसार वाटप करणे अपेक्षित होते व त्यासाठी संयुक्त बैठकही बोलविण्यात आली होती. परंतु त्या बैठकीत जागा वाटपाची काही एक चर्चा न होता पडद्याआड आखाडा परिषदेलाच सहमतीने जागा वाटपाचे अधिकार प्रदान करून प्रशासन नामनिराळे झाले. प्रत्यक्षात गेल्या दोन दिवसांपासून जागा वाटप करताना राबविण्यात येणाऱ्या पद्धतीमुळे अनेक खालशांच्या प्रमुखांनी नाराजी व्यक्त केली आहे. काहींनी अगदीच कोपऱ्यात व अपुरी जागा देण्यात आल्याची तक्रार केली तर काहींनी पुरविण्यात आलेल्या सुविधांबाबत नाराजी व्यक्त केली. शौचालयाला लागून जागा देण्यात येत असल्याने आरोग्य कसे सांभाळणार असा सवालही करण्यात आला तर काहींनी रस्त्यावरील मोक्याच्या जागा पैसे देऊन वाटप करण्यात येत असल्याचे सांगितले. दिगंबर आखाड्याच्या प्रमुखांनी तर या साऱ्या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त करून या साऱ्या गोष्टीला प्रशासनच जबाबदार असल्याचे क्रोधीत होऊन सांगितले व सायंकाळी बैठक घेऊन पुढील रणनीती ठरविण्याचा इशारा दिल्यावर घाबरलेल्या प्रशासनातील अधिकाऱ्यांनी तपोवनात धाव घेऊन वस्तुस्थिती समजावून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु क्रोधीत साधूंनी उपस्थित केलेल्या मुद्यावर समाधानकारक तोडगा निघण्याची वा काढण्याची शक्यता नसल्याने पाहून अधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला.
या संदर्भात प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी जागा वाटपाचा ‘आपसी’ मुद्दा असल्याचे सांगितले. साधू-महंतांनी आपापसात बसून त्यांना योग्य व सोयीची जागा मिळावी म्हणून आखाडा प्रमुखांकरवी जागा वाटप केले जात असून, हा वाद त्यांनाच मिटवावा लागणार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)