वीज वितरणच्या कामांसाठी निविदा मंजूरत्
By Admin | Updated: July 17, 2014 00:29 IST2014-07-16T23:03:32+5:302014-07-17T00:29:27+5:30
वीज वितरणच्या कामांसाठी निविदा मंजूरत्

वीज वितरणच्या कामांसाठी निविदा मंजूरत्
र्यंबकेश्वर : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विद्युत वितरणचा सुमारे पाच कोटी रुपयांचा आराखडा मंजूर झाला असून, तेवढ्याच रुपयांच्या निविदादेखील मागविण्यात येऊन एजन्सीदेखील निश्चित केली आहे. साधारणत: पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती त्र्यंबकेश्वरचे स्थानिक शहर सहायक अभियंता मंगेश प्रजापती यांनी दिली.
सिंहस्थ काळातच नव्हे तर ऐन पर्वणी काळात वीजपुरवठा खंडित होऊ नये. विजेत बिघाड होऊ नये तसेच वीज वितरणाची क्षमता वाढविण्यासाठी वीज वितरण कंपनीतर्फे पाच कोटींचा आराखडा सादर केला होता. शासनाने आराखडा मंजूर करून तसा आदेश वीज वितरणच्या जिल्हा कार्यालयाकडे पाठविला. या आदेशानुसार निविदा मागविण्यात आल्या. त्यानुसार नाशिकच्या एका विद्युत कॉन्ट्रॅक्टरला काम देण्यात आले आहे. येत्या पंधरवड्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचे समजते.
या कामांमध्ये भूमिगत लघुदाब वाहिनीचे साडेआठ कि.मी. लांबीचे काम करणे, भूमिगत केबलवर रोहित्र बसविणे, सध्या असलेल्या रोहित्रांच्या क्षमतेत वाढ करणे, खंबाळे उपकेंद्र ते त्र्यंबकेश्वर या १३ कि.मी.च्या उच्च वीज दाब वाहिनीचे (३३ केव्ही) साधारणत: २०० पोल उभारणे, उच्च दाब वीज वाहिनी (११ केव्ही) नवीन रोहित्र बसविणे त्यासाठी साधारणत: ९० पोल बसविणे, लघुदाब वाहिनी स्थलांतरित करणे आदि कामांचा समावेश वीज वितरण कंपनीच्या आराखड्यात असून, मार्च २०१५च्या आत सर्व कामे पूर्ण होतील. सदर ठेकेदारास ३१ मार्च ही अंतिम तारीख देण्यात आली आहे. शहरातील भूमिगत केबल्सचे काम शक्यतो लवकर उरकण्याचा मानस कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. कारण या केबल्स भूमिगत केल्यानंतरच पालिकेतर्फे रस्त्यांची कामे सुरू करण्यात येतील. (वार्ताहर)