लष्करातील भरतीसाठी दहा हजार युवकांचा सहभाग
By Admin | Updated: March 27, 2016 00:06 IST2016-03-27T00:05:16+5:302016-03-27T00:06:28+5:30
लष्करातील भरतीसाठी दहा हजार युवकांचा सहभाग

लष्करातील भरतीसाठी दहा हजार युवकांचा सहभाग
देवळाली कॅम्प : प्रादेशिक सेनेच्या देवळालीतील ११६ इंफ्रंट्री बटालियनमध्ये सैनिक, सफाई व सुतार कामाच्या पदासाठी शनिवारी झालेल्या भरतीप्रक्रियेत सुमारे दहा हजार युवक सहभागी झाले होते.
प्रादेशिक सेनेच्या ११६ इंफ्रंटी बटालियनमध्ये सैनिक, सफाई, सुतार कामाच्या दोनदिवसीय भरती प्रक्रियेसाठी शनिवारी पहाटे मेजर पी.एस. चक्रवर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात झाली. या भरतीसाठी देशाच्या विविध भागातून शुक्रवारी दुपारपासूनच हजारो युवक देवळालीत दाखल झाले होते.
भरतीसाठी नियमानुसार ५ मिनिटांत सुमारे १.६ किमी अंतर धावणे, शारीरिक चाचणी व वैद्यकीय तपासणी अशा पद्धतीने भरतीप्रक्रिया राबविण्यात आली. दहा हजारहून अधिक युवकांनी भरतीसाठी हजेरी लावल्याने लष्करी प्रशासनाची दमछाक झाली होती. युवकांच्या गर्दीमुळे मेढे मळा येथील टीए गेट व सह्याद्रीनगर येथील मैदानावरून युवकांना भरती परीक्षेसाठी सोडण्यात येत होते.
यावेळी देवळालीचे वरिष्ठ पोलीस राजेश आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रकाश निकम, प्रवीण माळी, अल्लाउद्दीन शेख, अनिल पवार आदिंसह ७० पोलिसांचा पहाटे ३ वाजेपासून बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भरतीसाठी आलेल्या देशातील कानाकोपऱ्यातील युवकांना पाणी पिण्यासाठी चंद्रकांत गोडसे, मनिष चावला यांनी टॅँकर उपलब्ध करून दिले होते. तर सामाजिक कार्यकर्ते महाराज बिरमानी यांनी युवकांना मोफत पुरीभाजी उपलब्ध करून दिली. कालपासूनच भरतीसाठी युवक दाखल झाले होते. (वार्ताहर)