जिल्ह्यातील दहा धरणे शंभर टक्के भरली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:16 IST2021-09-24T04:16:59+5:302021-09-24T04:16:59+5:30

नाशिक : गेल्या ऑगस्ट महिन्यात नाशिककरांची चिंता वाढविणाऱ्या पावसाने सप्टेंबरच्या उत्तरार्धात केलेल्या कृपादृष्टीमुळे जिल्ह्यातील धरणांनी शंभरी गाठली असून, आणखी ...

Ten dams in the district are 100 percent full! | जिल्ह्यातील दहा धरणे शंभर टक्के भरली!

जिल्ह्यातील दहा धरणे शंभर टक्के भरली!

नाशिक : गेल्या ऑगस्ट महिन्यात नाशिककरांची चिंता वाढविणाऱ्या पावसाने सप्टेंबरच्या उत्तरार्धात केलेल्या कृपादृष्टीमुळे जिल्ह्यातील धरणांनी शंभरी गाठली असून, आणखी काही धरणे भरण्याच्या मार्गावर असल्याने जिल्हावासीयांची चिंता मिटली आहे. गतवर्षीच्या तुलनेत अद्यापही १२ टक्के जलसाठा कमी असला तरी दहा धरणांनी शंभरी गाठली असून, आठ धरणे लवकरच शतक ठोकण्याची दाट शक्यता आहे.

जुलैच्या उत्तरार्धात झालेल्या जोरदार पावसामुळे काहीसा दिलासा मिळाल्याने पावसाला सुरुवात झाली असे वाटत असतानाच ऑगस्ट महिना कोरडा गेला आणि जिल्ह्यात पाणीटंचाईची चर्चा सुरू झाली. सप्टेंबरच्या प्रारंभी जिल्ह्यातील धरणांमध्ये जेमतेम ५० ते ६० टक्के इतका जलसाठा असल्यामुळे जिल्ह्यावर जलसंकट निर्माण झाल्याने पाणी नियोजन करण्याची वेळ आली. मात्र, सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात झालेला दमदार पाऊस आणि त्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून बरसणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणे तृप्त झाली असून, जिल्ह्यातील २४ लहानमोठ्या धरणांपैकी दहा धरणे शंभर टक्के इतकी भरली आहेत.

गंगापूर, आळंदी, वाघाड, दारणा, भावली, वालदेवी, हरणबारी, केळझर, नागासाक्या, ओणि माणिकपुंज ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. या सर्व धरणांमधून विसर्ग करण्याची वेळ आली असून, नांदुरमध्यमेश्वरमधून सर्वाधिक विसर्ग केला जात असून हे पाणी मराठवाड्याला मिळत आहे. या धरणांमध्ये सकाळी सुरू असलेला विसर्ग दुपारनंतर चार पटीने कमी करण्यात आल्याने सायंकाळपर्यंत अनेक धरणांमधून विसर्ग कमी झाला. त्यामुळे नदी, नाल्यांना आलेली पूरपरिस्थितीही नियंत्रणात आली.

दरम्यान, गंगापूर धरण समूहातील काश्यपी, गौतमी गोदावरी ही धरणे ९८ टक्के भरली असून, दोन दिवसांत त्यांची पातळी देखील वाढण्याची शक्यता आहे. पालखेड धरण शंभर टक्के होण्यास अवघे एक टक्का राहिला आहे. पुणेगाव प्रकल्पही ९५ टक्के इतका झाला आहे. कडवा धरण ९९ टक्के, तर चणकापूर ९७ टक्के भरले आहे. पुनद प्रकल्पातही ९८ टक्के इतका जलसाठा झाला आहे.

--इन्फो--

मागील वर्षीच्या तुलनेत १२ टक्के कमीच

जिल्ह्यातील धरणांची पातळी वाढली असली तरीही गत वर्षीच्या तुलनेत अजूनही १२ टक्के जलसाठा कमीच आहे. मागील वर्षी याच कालावधीत जिल्ह्यातील धरणांची सरासरी टक्केवारी ९५ टक्के इतकी होती, तर आता ८३ टक्के इतकी आहे. या धरण प्रकल्पांमध्ये ५४१८३ दलघफू उपयुक्त जलसाठा आहे. मागील वर्षी ६२२६० दलघफू इतका उपयुक्त जलसाठा शिल्लक होता.

Web Title: Ten dams in the district are 100 percent full!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.