जिल्हा परिषद सभापतींचे दूरध्वनी बंद
By Admin | Updated: May 31, 2014 02:05 IST2014-05-31T00:14:42+5:302014-05-31T02:05:27+5:30
नाशिक : जिल्हा परिषदेच्या विविध विषय समितींच्या सभापती कार्यालयांमधील दूरध्वनीची बिले भरली न गेल्याने गेल्या १५ दिवसांपासून सर्व दूरध्वनी बंद आहेत़ त्यामुळे सभापतींना विविध कामांसाठी संपर्क साधणे अडचणीचे ठरत असल्याने त्यांची डोकेदुखी वाढली आहे़

जिल्हा परिषद सभापतींचे दूरध्वनी बंद
नाशिक : जिल्हा परिषदेच्या विविध विषय समितींच्या सभापती कार्यालयांमधील दूरध्वनीची बिले भरली न गेल्याने गेल्या १५ दिवसांपासून सर्व दूरध्वनी बंद आहेत़ त्यामुळे सभापतींना विविध कामांसाठी संपर्क साधणे अडचणीचे ठरत असल्याने त्यांची डोकेदुखी वाढली आहे़
जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतींच्या दालनात शासनाच्या वतीने दूरध्वनी सेवा पुरवली जाते़ नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात आदर्श आचारसंहितेचे पालन करताना या पदाधिकार्यांना देण्यात आलेल्या सर्व शासकीय सुविधा बंद करण्यात आल्या होत्या़ आचारसंहितेच्या काळात सभापतीही कार्यालयात येत नव्हते़ त्यामुळे त्यांच्या कार्यालयातील दूरध्वनीचे बिल भरण्यात आले नव्हते़ आचारसंहिता संपल्यानंतर सभापतींना पुन्हा सार्या सुविधा देण्यात आल्या; परंतु दूरध्वनीचे बिल न भरल्याने दूरध्वनी मात्र बंदच आहेत़ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष वगळता अर्थ व बांधकाम सभापती, शिक्षण, आरोग्य, महिला व बालकल्याण व समाजकल्याण सभापती यांच्या कार्यालयांतील दूरध्वनी सेवा बंद असल्याने त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे़ जिल्हा परिषद अंतर्गत तसेच बाहेरील व्यक्तींशी, अधिकार्यांशी संपर्क करताना अडचणी येत आहेत़ या सर्व कामांसाठी सभापतींना स्वत:च्या मोबाइलवर अवलंबून राहावे लागत असल्याने सर्व सभापती कायम मोबाइलवरच बिझी असल्याचे दिसत आहे़ दरम्यान, त्यांच्या कार्यालयातील दूरध्वनीची बिले भरण्यासाठी तातडीने हालचाली सुरू असल्याचे समजते़