चांदवडच्या इमारत बांधकाम निविदेत तांत्रिक चूकच
By Admin | Updated: September 22, 2016 01:15 IST2016-09-22T01:15:20+5:302016-09-22T01:15:44+5:30
प्रशासनाची कबुली : चार महिन्यानंतर उघडली निविदा

चांदवडच्या इमारत बांधकाम निविदेत तांत्रिक चूकच
नाशिक : चांदवड प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाची निविदा तब्बल चार महिन्यानंतर उघडण्यात आल्याची बाब उघड झाल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने ही तांत्रिक चूक असल्याची कबुली दिली आहे. विशेष म्हणजे पदावर नसलेल्या कार्यकारी अभियंत्यांकडून बदली झाल्यानंतर या कामाची निविदा उघडण्यात आल्याने याबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे.
यासंदर्भात महेंद्र साळवे नामक सुशिक्षित बेराजगार अभियंत्यांनी विभागीय आयुक्तांना निवेदन दिले आहे. निवेदनात चांदवड पंचायत समिती प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाची निविदाप्रक्रिया तांत्रिक व प्रशासकीयदृष्ट्या चुकीच्या पद्धतीने राबविण्यात आल्याचा आरोप केला होता.
चांदवड पंचायत समिती प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी ३० एप्रिलपर्यंत निविदा मागविण्याची अंतिम तारीख होती. त्यानंतर नियमाप्रमाणे रीतसर आठ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक असताना, चक्क ७ सप्टेंबरला ही निविदा उघडण्यात आली. त्यातही निविदाप्रक्रिया काळात पदावर असलेले कार्यकारी अभियंता अनिल पाटील यांनी पदभार सोडण्याआधी निविदा का उघडली नाही. ते पदावर नसताना ७ सप्टेंबरला ही निविदा उघडण्यात येऊन यात अनियमितता झाल्याने फेरनिविदा काढण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे शासन निर्णयानुसार १२० दिवसांपर्यंत निविदा उघडण्यात आली नाही किंवा निविदेची कार्र्यवाही झाली नाही, तर नव्याने निविदाप्रक्रिया राबविणे आवश्यक आहे. प्रशासनाने १२० दिवसात निविदा उघडली नाही तर नव्याने फेरनिविदा काढण्याचा शासन नियम असून, या प्रकरणात तांत्रिक चूक झाल्याची कबुली दिली आहे; मात्र प्रशासनाच्या मंजुरीनेच मागील काळातील कार्यकारी अभियंत्यांची डिजिटल सिग्नेचर वापरण्यात आल्याचे प्रशासनाचे म्हणणे
आहे. चार महिन्यांनंतर पदावर नसलेल्या कार्यकारी अभियंत्यांच्या डिजिटल स्वाक्षरीने उघडलेल्या या निविदेमुळे सुमारे दोन कोटी ९७ लाखांचे हे बांधकाम वादात सापडले आहे. त्यामुळेच आता या कामाची फेरनिविदा काढण्याबाबत प्रशासन स्तरावरून विचार सुरू आहे. (प्रतिनिधी)