शिक्षकांचे बेमुदत उपोषण सुरू
By Admin | Updated: April 4, 2016 00:10 IST2016-04-04T00:10:51+5:302016-04-04T00:10:52+5:30
अन्याय : समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार

शिक्षकांचे बेमुदत उपोषण सुरू
उपनगर : वाघेलेतांडा येथील प्राथमिक आश्रमशाळा शिक्षक कर्मचाऱ्यांच्या बाजूने उच्च न्यायालयाने १२ वर्षांनंतर निकाल देऊनही समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपआयुक्त काशीनाथ गवळे यांनी केलेल्या अन्यायाच्या विरोधात संबंधित आश्रमशाळा शिक्षक मनोहर पाटील, अविनाश पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी समाजकल्याण कार्यालय विभागाच्या प्रवेशद्वाराबाहेर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
उच्च न्यायालयाने वाघेलेतांडा येथील प्राथमिक आश्रमशाळा शिक्षकांच्या बाजूने ३१ आॅक्टोबर २०१४ रोजी निकाल देऊन शासनास सदर कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याचे आदेश दिले होते. मात्र समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपआयुक्त काशीनाथ गवळे हे अद्यापही कर्मचाऱ्यांचे समायोजन घेत नसल्यामुळे सदर कर्मचाऱ्यांनी गेल्या १५ आॅगस्टला आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यावेळी प्रा. उपआयुक्त गवळे यांनी संच मान्यता काढून आपले लवकरच समायोजन केले जाईल, असे आश्वासन दिले होते. (वार्ताहर)