शिक्षकांचे वेतन रखडले
By Admin | Updated: October 4, 2015 23:24 IST2015-10-04T23:24:15+5:302015-10-04T23:24:59+5:30
गैरसोय : आॅनलाइनचा प्रयोग फसला

शिक्षकांचे वेतन रखडले
पेठ : नाशिक जिल्हा परिषदेसह राज्यातील प्राथमिक शिक्षकांना दरमहा १ तारखेला आॅनलाइन वेतन अदा करणारी शालार्थ प्रणाली दोन महिन्यांपासून कोलमडल्याने जिल्ह्यातील शिक्षकांना आॅगस्ट महिन्याचे वेतन आॅक्टोबर सुरू झाला तरी मिळाले नाही. यामुळे शिक्षकांची आर्थिक गणिते विस्कळीत झाली असून, विविध संस्था व बँकांकडून घेतलेल्या कर्जांचे हप्ते थकल्याने आता शिक्षकांचीही उपसमार होते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे़
यापूर्वी शिक्षकांचे वेतन पंचायत समितीकडून केले जात होते; मात्र एप्रिलपासून शालार्थ प्रणालीद्वारा वेतन बिल जनरेट करून राज्य शासनाकडे वेतनाची मागणी केली जाते़ त्यानुसार किमान प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला शिक्षकांच्या खात्यावर वेतन जमा होईल, अशी आशा बाळगणाऱ्या शिक्षकांचा चांगलाच हिरमोड झाला असून, अनेक दिवसांपासून शालार्थ वेबसाइट बिघाड झाल्याने शिक्षकांना आॅगस्ट महिन्याचे वेतनही अजून मिळाले नाही़ शिवाय सप्टेंबर महिन्याच्या वेतनाचे अजून शक्यता नसल्याने शिक्षकांना आर्थिक अडचण भासू लागली आहे़ बहुतांश शिक्षकांनी घर, कार व मुलांच्या उच्चशिक्षणासाठी जिल्ह्यातील शिक्षकांच्या पतसंस्था व बँकांकडून कर्ज घेतले असून, वेतन नसल्याने कर्जाचे हप्ते भरणे शक्य झाले नसल्याने व्याजाचा भुर्दंड बसणार आहे. अनेकांना घरखर्चासाठीही उसणवारी करावी लागत असल्याने शिक्षकांचे आर्थिक गणितं पूर्णपणे कोलमडले आहे़तर परजिल्ह्यातील शिक्षकांना हातात पैसे नसल्याने गावी जाणेही शक्य होत नसल्याची वस्तूस्थिती आहे़ सद्या राज्यात शिक्षणावर अनेक प्रकल सुरू असून जनगणनेसह निवडणूकसारख्या कामांना शिक्षकांना जुंपले जात़ सद्यस्थितीत प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा उपक्रम सुरू असतांना दुसरीकडे शिक्षकाला दोन तीन महिने वेतन न मिळाल्याने त्यांची प्रकल्प यशस्वी करण्याची मानसिकता कितपत टिकून राहिल अशी शंका उपस्थित केली जात आहे़ तरी याबाबत शासनस्तरावर तात्काळ उपाययोजना करून किमान दिवाळी पूर्वी तरी शिक्षकांना दोन्हीही पगार अदा करावेत अशी मागणी शिक्षकांकडून केली जात आहे़ (वार्ताहर)