कोरोना नियंत्रण मोहिमेत शिक्षकांना विमा कवचच नाही, सुरक्षा वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:18 IST2021-04-30T04:18:09+5:302021-04-30T04:18:09+5:30
नाशिक : जिल्ह्यातील कोरोना नियंत्रण मोहिमेत शिक्षकांची नेमणूक करण्यात आली असून, शिक्षकांना गाव सर्वेक्षण व टोल नाका परिसरात ...

कोरोना नियंत्रण मोहिमेत शिक्षकांना विमा कवचच नाही, सुरक्षा वाऱ्यावर
नाशिक : जिल्ह्यातील कोरोना नियंत्रण मोहिमेत शिक्षकांची नेमणूक करण्यात आली असून, शिक्षकांना गाव सर्वेक्षण व टोल नाका परिसरात बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवशांची माहिती नोंदविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. परंतु या जोखमीच्या माहिमेत शिक्षकांना कोरोना संसर्गाचा धोका उद्भवण्याच्या धोका असताना त्यांना कोणत्याही प्रकारचे विमा सुरक्षा कवचच दिले गेलेले नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
नाशिक जिल्ह्यात सुमारे १३ हजारांहून अधिक प्राथमिक शिक्षक आहे. सध्या प्राथमिक शाळा बंद असल्याने या शिक्षकांना कोरोना नियंत्रण मोहिमेत सामावून घेण्यात आले आहे. त्याशिवया इगतपुरी, सिन्नर, निफाडसारख्या तालुक्यांमध्ये माध्यमिक शिक्षकही या मोहिमेत काम करीत आहेत. मात्र या शिक्षकांच्या नियुक्त्या थेट तालुकास्तरावर तालुका आपत्ती निवारण अधिकारी करीत असल्याने या मोहिमेत प्रत्यक्ष किती शिक्षक कार्यरत आहेत. किती शिक्षकांना कोरोना बाधा होऊन त्यांची प्रकृती बिघडली याविषयी जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग अनभिज्ञ आहे. त्यामुळेच एकीकडे शिक्षक संघटनांकडून कोरोना नियंत्रण मोहिमेत ५०हून अधिक शिक्षकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात असताना जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे मात्र माहिमेत कार्यरत शिक्षकांच्या प्रकृती अथवा मृत्यूविषयी कोणतीही माहिती उपलब्ध नाही, तर मनपा क्षेत्रात शिक्षक विभागाने महापालिकेचे ८२७ व खासगी शिक्षण संस्थांच्या प्राथमिक शाळांमधील ७९० असे एकूण १,७१७ शिक्षक या कोरोना नियंत्रण मोहिमेसाठी उपब्ध करून दिल्याची माहिती शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी सुनीता धनगर यांनी दिली.
शिक्षकांना हवे विमासुरक्षा कवच
कोरोना नियंत्रण सेवेत असलेल्या शिक्षकांना डिसेंबर २०२०पूर्वी विमा संरक्षण देण्यात आले होते. ते पुढे नियमित ठेवणे आवश्यक होते. पण तसे झाले नाही, सध्या गाव सर्वेक्षणात शिक्षकांना घरोघरी जावे लागत असून, टोलनाका, समन्वय व संपर्क केंद्राच्या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना कोरोनाचा धोका असल्याने विमा संरक्षण आवश्यक आहे. शिवाय शासकीय सेवेमुळे शिक्षकांना घरातील रुग्णांकडे लक्ष देणेही शक्य होत नाही. त्यामुळे असा शिक्षकांना दिलासा देण्यासंदर्भात विचार होणे आवश्यक आहे.
- अशोक ठाकरे, सचिव, प्राथमिक शिक्षक संघ
---
प्राथमिक शिक्षकांना बदली पद्धतीने काम द्यावे, आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत शिक्षण विभागातील प्राथमिक व्यतिरिक्त जे मनुष्यबळ उपलब्ध आहे, त्याचे योग्य नियोजन करून प्राथमिक शिक्षकांना दिलासा द्यावा, त्यासाठी शासनाच्या अन्य विभागांतील कर्मचाऱ्यांचीही मदत घेणे शक्य आहे. त्याचा विचार करून कोरोना नियंत्रण सेवेतील मनुष्यबळाचे नियोजन होणे आवश्यक आहे.
- नंदलाल धांडे, अध्यक्ष, खासगी प्राथमिक शिक्षक संघ
---
कोरोना सेवेत कार्यरत शिक्षकांना विमा सुरक्षा कवच मिळण्याची गरज आहे. त्यामुळे किमान त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळू शकेल. त्याचप्रमाणे गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून प्राथमिक शिक्षक कोरोना नियंत्रण सेवेत अविरत कार्यरत आहे. आता त्यांना दिलासा मिळण्याची गरज आहे. अन्यथा प्राथमिक शिक्षकही काम बंद करतील.
-राजेंद्र निकम, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य खासगी शिक्षक संघ
---
कोरोना नियंत्रण सेवेसाठी यावेळी आवश्यकतेनुसार तालुकास्तरावर शिक्षकांच्या नेमणुका तालुका आपत्ती निवारण अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हास्तरावर अशा शिक्षकांची एकत्रित माहिती उपलब्ध नाही. त्याचप्रमाणे शिक्षकांच्या विमा सुरक्षेविषयीही अद्याप स्पष्टता नाही.
- राजीव म्हसकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद
पॉईंटर -
जिल्ह्यातील एकूण शिक्षक-४१,२१७
प्राथमिक शिक्षक -१३२६५
कोरोना नियंत्रण मोहिमेत कार्यरत शिक्षक सुमारे १०,०००