जनगणना कार्यशाळेवर शिक्षक संघाचा बहिष्कार
By Admin | Updated: October 11, 2015 22:19 IST2015-10-11T22:19:03+5:302015-10-11T22:19:30+5:30
जनगणना कार्यशाळेवर शिक्षक संघाचा बहिष्कार

जनगणना कार्यशाळेवर शिक्षक संघाचा बहिष्कार
सिन्नर : राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावतीकरण व बीएलओ कामकाज प्राथमिक शिक्षकांना न देण्याची मागणी प्राथमिक शिक्षक संघाने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. तहसील व पंचायत समिती कार्यालयात आयोजित जनगणना कार्यशाळेवर प्राथमिक शिक्षक संघाने बहिष्कार टाकला आहे.
बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क अधिनियम २००९च्या कलम २७नुसार प्राथमिक शिक्षकांना लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक, दशवार्षिक जनगणना व नैसर्गिक आपत्ती निवारण कार्य या तीन कामाव्यतिरिक्त इतर कोणतेही अशैक्षणिक कामे देऊ नये, असे स्पष्ट निर्देश असतानादेखील सिन्नर गटातील १५७ प्राथमिक शिक्षकांना राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावतीकरण व १५० प्राथमिक शिक्षकांना मतदार याद्यांचे पुनरीक्षण करण्याकामी महिनाभरासाठी प्रगणक व बीएलओ म्हणून आदेश देण्यात आल्याचे प्राथमिक शिक्षक संघाने म्हटले आहे.
पंचायत समिती व तहसील कार्यालयात आयोजित लोकसंख्या अद्ययावतीकरण व बीएलओ कार्यशाळेवर प्राथमिक शिक्षक संघाने टाकला असून, ही कामे प्राथमिक शिक्षकांना न देण्याची मागणी तहसीलदार मनोजकुमार खैरनार यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष अंबादास वाजे, तालुकाध्यक्ष विलास ढोबळे, मिलिंद गांगुर्डे, दत्तात्रय वरंदळ, नवनाथ आढाव, बबन आव्हाड, ज्ञानेश्वर देसले, अशोक साळवे, सोमनाथ कराड, सुरेश उगले, भारत शिरोळे आदिंसह प्राथमिक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)