चवीने खाणार त्याच्या खिशाला झळ बसणार! वडापाव महागला : किराणा मालाच्या दरवाढीमुळे घेतला निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 00:49 IST2021-01-02T18:51:15+5:302021-01-03T00:49:51+5:30
नाशिक : वडापावचे नुसते नाव जरी घेतले तरी तोंडाला पाणी सुटायला लागते. झणझणीतपणा आणि चवदार गुणांमुळे वडापावने नाशिककरांना भुरळ घातलेली आहे.

चवीने खाणार त्याच्या खिशाला झळ बसणार! वडापाव महागला : किराणा मालाच्या दरवाढीमुळे घेतला निर्णय
नाशिक : वडापावचे नुसते नाव जरी घेतले तरी तोंडाला पाणी सुटायला लागते. झणझणीतपणा आणि चवदार गुणांमुळे वडापावने नाशिककरांना भुरळ घातलेली आहे. मात्र, ह्याच वडापावसाठी नाशिककरांना आता जादा पैसे मोजावे लागणार आहे. शहरातील वडापाव विक्रेत्यांनी १ जानेवारी २०२१ पासून वडापावच्या दरात वाढ केली आहे. याशिवाय, समोसा, सॅण्डवीच, पाववडा, दाळवडा आणि भजीही महागली आहे. कोरोनामुळे अनेकांचे व्यवसाय डबघाईला आले. त्यात रस्त्यांवर ठेले टाकून वडापावसह स्नॅक्सची विक्री करणारे व्यावसायिकही अडचणीत आले. अनेकांना आपले व्यवसाय बंद करावे लागले. आता कोरोनाचे सावट काहीसे कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा या व्यवसायाने उभारी घेतली असताना वाढत्या महागाईने त्याला घेरले आहे. वडापावसाठी लागणाऱ्या किराणा मालाच्या दरात वाढ झाल्याने विक्रेत्यांना हा व्यवसाय परवडेनासा झाला आहे. शहरात वडापाव प्रति नग १२ रुपयांनी विक्री केला जात होता. परंतु, वाढत्या महागाईमुळे १ जानेवारी २०२१ पासून वडापावचे दर आता १५ रुपये प्रतिनग करण्यात आला आहे. वडापावसाठी लागणारे बटाटे तसेच तेल, बेसन, पाव लादी यात दरवाढ झाल्याने विक्रेत्यांना हा दरवाढीचा निर्णय घेणे भाग पडल्याचे सांगितले जात आहे. वडापावबरोबरच समोसा, सॅण्डवीच, पाववडा, दालवडा तसेच भजी यांच्याही दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे चवीने खाणाऱ्या खवय्यांच्या खिशाला आणखी झळ बसणार आहे.
साहित्यात झालेली दरवाढ
बटाटे - ५० रुपये किलो
तेल - २१०० रुपये (१५ किलो)
बेसन - ७५० रुपये (१० किलो)
पाव लादी - ३५ रूपये (२४ पाव)
कोरोनामुळे आम्ही व्यावसायिकही प्रचंड अडचणीत सापडलो. आता गेल्या काही महिन्यांपासून किराणा साहित्यातही सातत्याने वाढ होत आहे. ग्राहकांसाठी आम्ही दरवाढ केली नव्हती परंतु आता वाढत्या महागाईने व्यवसाय करणे परवडेनासे झाले आहे. त्यामुळे नाईलाजास्तव आम्ही व्यावसायिकांनी वडापावसह अन्य स्नॅक्सच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
- निवास मोरे, संचालक, नाशिक वडापाव