‘लक्ष्य’वेधी हुंकार!
By Admin | Updated: September 25, 2016 00:21 IST2016-09-25T00:21:18+5:302016-09-25T00:21:51+5:30
मराठा क्रांती मोर्चा; अवघे शहर भगवेमय

‘लक्ष्य’वेधी हुंकार!
नाशिक : तपोभूमी असलेल्या तपोवनातील साधुग्रामच्या जगद्गुरू रामानंदाचार्य महाराज प्रवेशद्वारापासून मराठा क्रांती मूक मोर्चाला सकाळी १०.४० वाजता आरंभ झाला. राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवरायांना अभिवादन करत आणि हाती भगवे ध्वज आणि घोषणाफलक घेत मोर्चात लाखोंच्या संख्येने सहभागी झालेला मराठा समाजाचा महासागर नाशिकच्या रस्त्यांवरून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ झाला.
शिस्तबद्ध आणि नेटक्या नियोजनानुसार निघालेला मूक मोर्चा औरंगाबाद नाका, आडगाव नाका, पंचवटी कारंजा, होळकर पूल, रविवार कारंजा, रेडक्रॉस, महात्मा गांधी मार्ग, जिल्हाधिकृारी कार्यालय, सीबीएस, त्र्यंबक नाकामार्गे गोल्फ क्लब मैदानावर जाऊन धडकला. मोर्चा मार्गावर नाशिककरांनीही दुतर्फा गर्दी करीत आपला पाठिंबा दर्शविला.
त्यानंतर मराठा समाज बांधवांनी गोल्फ क्लब मैदानाकडे प्रस्थान केले. गोल्फ क्लब मैदानावर सकाळपासूनच मोठा जनसमुदाय हजर झालेला होता. लगतचे इदगाह मैदानही मोर्चेकऱ्यांच्या गर्दीने भरले होते. मैदानावर उभारण्यात आलेल्या मुख्य व्यासपीठावरून सई वाघचौरे, चेतना अहेर, स्नेहा तांबे, मयुरी पिंगळे, रुचा पाटील, पल्लवी फडोळ, जना चौधरी, आकांक्षा पवार, रसिका शिंदे या मुलींनी आपले मनोगत व्यक्त करत कोपर्डी घटनेचा निषेध नोंदविला, शिवाय मराठा आरक्षण आणि अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर यावरही भाष्य केले. साक्षी चव्हाण या विद्यार्थिनीने मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देणाऱ्या निवेदनाचे जाहीर वाचन केले. त्यानंतर प्रतिज्ञा घेण्यात आली. याठिकाणी विद्यार्थिनींनी निवेदनाद्वारे मागण्यांचे जाहीर वाचन केले. सरतेशेवटी राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता झाली.
प्रमुख मागण्या
कोपर्डी घटनेतील आरोपींवर निर्भया कायद्यानुसार कारवाई करावी.
कोपर्डी प्रकरणाची जलदगती न्यायालयात सुनावणीची प्रक्रिया राबवून गुन्हेगारांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्यावी.
अॅट्रॉसिटी कायदा रद्द करावा. खोट्या केसेस दाखल करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी.
मराठ्यांना आरक्षण द्यावे.
शेतकऱ्यांच्या शेतीमालाला कायमस्वरूपी हमीभाव देण्यात यावा.
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती १९ फेब्रुवारीलाच साजरी व्हावी.
छत्रपती शिवरायांचे स्मारक अरबी समुद्रात एक वर्षाच्या आत पूर्ण करावे.
महिलांचा मोठा सहभाग
महिला, युवती या देखील एकत्रितरित्या मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होण्यासाठी जात होत्या. महिलांनी काळ्या-भगव्या रंगाच्या साड्या परिधान केलेल्या होत्या. तर अनेक युवतींने काळा टी-शर्ट, काळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान करून हातात भगवे झेंडे, डोक्यावर मी मराठा लिहिलेल्या टोप्या घातल्या होत्या. मोर्चेकरी कुठलीही हुल्लडबाजी न करता अत्यंत शांततेने मोर्चात सहभागी होण्यासाठी जात होते. प्रत्येकजण एकमेकांला सहकार्य करत, आधार देताना दिसत होता. मोर्चामध्ये वयोवृद्ध नागरिक, महिला, लहान मुले-मुली यांचा देखील मोठा सहभाग होता. तर मोर्चेकरांच्या काही जथ्थ्यांमध्ये लहान मुले-मुली छत्रपती शिवाजी महाराज, मॉसाहेब जिजाऊ, मावळ्यांच्या वेशात सहभागी झाल्याने विशेष आकर्षण ठरले होते.