...‘तारे’मुळे वाचली चिमुरडीच्या आयुष्याची दोरी
By Admin | Updated: April 29, 2017 02:46 IST2017-04-29T02:46:06+5:302017-04-29T02:46:16+5:30
चारवर्षीय चिमुरडीला दोन बिबट्यांनी मानेला धरून उचलून पळवून नेल्यानंतरही शेतात असलेल्या ‘तारां’मध्ये अडकल्याने चिमुरडी बचावल्याची घटना मध्यरात्री घडली.

...‘तारे’मुळे वाचली चिमुरडीच्या आयुष्याची दोरी
शैलेश कर्पे सिन्नर
ज्याच्या आयुष्याची दोरी बळकट असते ती व्यक्ती यमाच्या तावडीतूनही सहीसलामत बाहेर पडते याचा प्रत्यय तालुक्यातल्या शिवडे शिवारात आला. आई-बापाच्या मध्ये झोपलेल्या चारवर्षीय चिमुरडीला दोन बिबट्यांनी मानेला धरून उचलून पळवून नेल्यानंतरही केवळ काकडीच्या शेतात असलेल्या ‘तारां’मध्ये अडकल्याने चिमुरडी आश्चर्यकारक बचावल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. या थरारक घटनेत चारवर्षीय चिमुरडी बचावली असून, तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील मेंढपाळ कुटुंबीय मेंढ्या चारण्यासाठी गेल्या महिन्यापासून तालुक्यात आले आहेत.गेल्या आठ दिवसांपासून या मेंढपाळांचा मुक्काम तालुक्याच्या पश्चिम डोंगराळ भागातील शिवडे शिवारातील आनंदा अरुण हारक यांच्या कांदे काढलेल्या शेतात होता. नेहमीप्रमाणे दिवसभर मेंढ्या चारल्यानंतर थकलेले लकडे कुटुंबीय मेंढ्यांच्या कळपाच्या तीनही बाजूने झोपी गेले होते. शिवडे-घोरवड रस्त्यालगत शेतात उघड्यावर झोपलेल्या मल्हारी लकडे व त्यांची पती या दोघांच्या मधोमध त्यांची चार वर्षाची चिमुरडी जनाबाई झोपली होती. रात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास अचानक बिबट्यांनी मेंढ्यांच्या कळपावर हल्ला केला. या दोन बिबट्यांसोबत बछडा असल्याचे सांगण्यात येते. बिबट्यांनी जनाबाई हीच्या मानेला धरुन तीला अलगद उचलून पळवून नेले. मात्र जनाबाईचा रडण्याचा आवाज व पाळीव कुत्र्यांनी बिबट्याला दिशेने जोरदार भुंकणे सुरु केल्याने मल्हारी लकडे त्यांची पती व इतर मेंढपाळ जागे झाले. बिबट्यांच्या हल्ल्यामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.
बिबट्यांनी चार वर्षाच्या चिमुरडीला फरफडत ओढत नेण्यास प्रारंभ केला. शेजारीच असलेल्या काकडीच्या शेतात जनाबाईला ओढत नेले. मात्र काकडीच्या शेतात तारा असल्याने त्यात जनाबाई अडकली. कुत्र्यांचे भुंकणे व लकडे कुटुंबियांनी केलेला आरडाओरडा यामुळे बिबट्यांनी तारेत अडकलेल्या चिमुरडीला सोडून धूम ठोकली. लकडे कुटुंबियांनी जनाबाईच्या रडण्याच्या आवाजाच्या दिशेने अंधारात शोधाशोध सुरु केली. सुमारे शंभर फुटावर असलेल्या काकडीच्या शेतात पोटचा गोळा दिसल्यानंतर तीच्या आईवडिलांनी एकच हंबरडा फोडला. बिबट्यांनी जनाबाईला उचलून फरफडत नेल्याने चिमुरडीच्या मान, पाठ व डाव्या गालावर जखमा झाल्या आहेत. तीच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून तीची प्रकृती सुधारत आहे.