मचानवाले बाबांची २२ नोव्हेंबरपर्यंत तपश्चर्या
By Admin | Updated: September 29, 2015 22:52 IST2015-09-29T22:51:23+5:302015-09-29T22:52:04+5:30
साधुग्राम : हिवाळ्यात थंड पाण्याचे माठ डोक्यावर ठेवून साधना

मचानवाले बाबांची २२ नोव्हेंबरपर्यंत तपश्चर्या
नाशिक : साधुग्राममध्ये महंत रघुवीरदास महात्यागी यांची लाकडी मचानवर तपश्चर्या सुरू असून, २२ नोव्हेंबरपर्यंत ते फलाहार सेवन करून उपासना करणार आहेत. त्यासाठी त्यांना प्रशासनाने मचानवरच पाण्याची व्यवस्था केली आहे. ठरलेल्या कालावधीचा संकल्प पूर्ण होईपर्यंत मचानवरून उतरणार नसल्याचे त्यांनी सांगितले. हिवाळ्यात थंड पाण्याचे माठ डोक्यावर ठेवून इष्टदेवतेची उपासना ते करणार आहेत.
साधुग्राममधील बटूक हनुमान मंदिराजवळील मचानवर त्यांची २७ जुलैपासून तपश्चर्या सुरू आहे. कडक ऊन, वारा, पाऊस अशा वातावरणात रघुवीरदास महाराज उपासना करीत आहेत. ध्यान साधना नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार असल्याने प्रशासनाने याठिकाणी वीज, पाणी याकडे लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच संकल्प पूर्ण होईपर्यंत मचानवर सुरू असलेली पाण्याची व्यवस्था कायम ठेवण्याचीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था बंद केल्यास पाणी न घेता साधना करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र प्रशासन सुविधा उपलब्ध करून सहकार्य करेल, अशी आशा त्यांना आहे. स्वत:च्या हाताने पाणी पिण्याचा संकल्प असल्याने व जमिनीवर न उतरता साधना पूर्ण करणार आहे. त्यामुळे दुसऱ्यांकडून पाणी घेऊ शकत नाही.
रघुवीरदास यांची पाणी आणि फळावर सध्या उपासना सुरू आहे. शिजवलेले अन्न सेवन न करता ते ही कठोर तपश्चर्या करीत आहेत. त्यास चतुर्मास तपश्चर्या संबोधले जाते. तसेच १२ फेब्रुवारीपासून ते अग्नीजवळ धुनी तपश्चर्या करणार आहेत. वयाच्या सतराव्या वर्षापासून त्यांच्या अशा विविध प्रकारच्या साधना सुरू आहेत. सध्या साधुग्राममध्ये विविध आखाड्यांचे साधू-महंत पर्वणी संपताच आश्रमात रवाना झाले आहेत. मात्र त्यांची उपासना सुरू असल्याने त्यांच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ कायम असल्याचे दिसून येते. (प्रतिनिधी)