तळीरामांची दिवाळीपूर्वीच ‘दिवाळी’
By Admin | Updated: October 22, 2016 22:42 IST2016-10-22T22:41:47+5:302016-10-22T22:42:24+5:30
पांढुर्ली : सिन्नर-घोटी मार्गावर मद्याचा ट्रक उलटला

तळीरामांची दिवाळीपूर्वीच ‘दिवाळी’
पांढुर्ली : सिन्नर - घोटी मार्गावर मुंबईकडे मद्याचे बॉक्स घेऊन जाणारा ट्रक उलटल्याची घटना शुक्रवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास घडली. मद्याचे बॉक्स रस्त्यावर पडलेले असल्याची वार्ता मध्यरात्री अनेकांच्या कर्णोपकर्णी गेल्यानंतर अनेकांनी मद्याचे बॉक्स व बाटल्या पळवत दिवाळीपूर्वीच ‘दिवाळी’ साजरी केल्याची चर्चा आहे.
वैजापूर तालुक्यातील लोणी येथील पोपट बागुल हा चालक त्याच्या ताब्यातील ट्रकमध्ये (क्र. एमएच १५ डीके २९७७) मद्याचे ७७५ बॉक्स घेऊन मुंबईकडे जात होता. आंध्र प्रदेशातील धर्माबाद येथील पोहेनर कंपनीतून मद्याचे बॉक्स घेऊन जालना, औरंगाबादमार्गे सिन्नरहून मुंबईकडे जात असताना पांढुर्लीजवळ समोरून येणाऱ्या ट्रकने हूल
दिली. यामुळे चालकाने ट्रक डाव्या बाजूला घेतला मात्र नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. त्यामुळे मद्याचे बॉक्स रस्त्यावर पसरले. त्यात अनेक बाटल्या फुटल्या. रात्री मद्याचे बाटल्या घेऊन जाणारा ट्रक रस्त्याच्या कडेला उलटल्याचे अनेकांना समजल्यानंतर तळीरामांनी घटनास्थळी धाव घेतल्याचे समजते. घटनास्थळी अंधार असल्याने त्याचा फायदा घेत
अनेकांनी मद्याचे बॉक्स व बाटल्या पळवल्या. घटनेची माहिती पोलिसांना समजल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या तळीरामांना रोखल्याचे समजते. त्यानंतर शनिवारी दुपारपर्यंत पोलीस ट्रकजवळ बसून होते. दिवाळीपूर्वीच तळीरामांची दिवाळी झाल्याची परिसरात जोरदार चर्चा आहे. (वार्ताहर)