तळेगाव प्रकरणी सोमवारी दोषारोपपत्र शक्य
By Admin | Updated: October 22, 2016 01:55 IST2016-10-22T01:54:29+5:302016-10-22T01:55:01+5:30
तळेगाव प्रकरणी सोमवारी दोषारोपपत्र शक्य

तळेगाव प्रकरणी सोमवारी दोषारोपपत्र शक्य
नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव येथील अल्पवयीन मुलगी अत्याचार प्रकरणाचा तपास जवळपास पूर्ण होत आला असून, येत्या सोमवारी वा मंगळवारी न्यायालयात संशयिताविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे़ या अत्याचार प्रकरणावरून इगतपुरी, त्र्यंबकेश्वर व नाशिक तालुका तसेच सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत तणाव निर्माण झाला होता़
तळेगाव येथील पाच वर्षीय अल्पवयीन मुलीवर तेथीलच एका अल्पवयीन मुलाने अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी (दि़ ८) घडली होती़ या घटनेच्या निषेधार्थ रविवारी (दि़ ९) सकाळी तळेगाव फाट्यावर रास्ता रोको करण्यात आला होता़ या ठिकाणी संतप्त जमावाने हिंसक होत पोलिसांवर दगडफेक तसेच शासकीय वाहने पेटवून दिली व दंगलीचे लोण हळूहळू शहरासह ग्रामीण भागातही पसरले होते़ यामुळे नाशिक ग्रामीणमधील वाडीवऱ्हे, गोंदे, विल्होळी, सांजेगाव, तळेगाव, अंजनेरी, तळवाडे, शेवगेडांग या गावांमध्ये संचारबंदीही लागू करण्यात आली होती़
नाशिक जिल्ह्यातील या तणावाच्या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, विरोधी पक्षनेते राधाकृ ष्ण विखे पाटील, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह मंत्री, विविध पक्षांचे आमदार व खासदारांनी पीडित मुलीची भेट घेतली होती. तसेच नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले होते़, तर गृहराज्यमंत्री केसरकर यांनी या गुन्ह्यात पंधरा दिवसात संशयिताविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते़ गृहराज्यमंत्री केसरकर यांच्या आदेशानुसार ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तळेगाव प्रकरणाचा तपास जवळपास पूर्ण केला आहे़ तसेच येत्या सोमवारी (दि़ २४) वा मंगळवारी (दि़ २५) जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे़ (प्रतिनिधी)
तळेगाव अल्पवयीन मुलगी अत्याचार प्रकरणाचा तपास पंधरा दिवसांत पोलिसांनी पूर्ण केला आहे़ या घटनेस शनिवारी (दि़ २२) पंधरा दिवसांचा कालावधी पूर्ण होतो आहे़; मात्र शनिवारी व रविवारी न्यायालयास सुटी असल्याने सोमवारी वा मंगळवारी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले जाईल़
- अंकुश शिंदे, पोलीस अधीक्षक