वंचित मुलांना आणा शिक्षणाच्या प्रवाहात
By Admin | Updated: July 18, 2014 00:39 IST2014-07-17T23:26:09+5:302014-07-18T00:39:22+5:30
वंचित मुलांना आणा शिक्षणाच्या प्रवाहात

वंचित मुलांना आणा शिक्षणाच्या प्रवाहात
नाशिक : बसस्थानक, सिग्नलवर भीक मागणारी किंवा काहीतरी वस्तू विकणारी मुले शिक्षणापासून वंचित राहत असल्याने त्यांना याठिकाणी प्रतिबंध करून शाळेत शिक्षण घेण्यासाठी पाठवा, अशा आवाहनासाठी पालिका शिक्षण मंडळाच्या वतीने यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी वंचित मुलांना शाळेच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जात असताना, दुसरीकडे सहा ते चौदा वयोगटातील मुले मात्र बसस्थानक, रेल्वेस्थानक, सिग्नल येथे गजरे, खेळणी किंवा अन्य साहित्य विकताना आढळतात. काही मुले तर भीकही मागतात. ही ठिकाणे मुलांना रोजगार देत असली, तरी त्यामुळे ही मुले शिक्षणापासून वंचित राहत असल्याने आता त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिका शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी किरण कुंवर तसेच शिक्षकांनी आगार व्यवस्थापक, रेल्वे स्टेशनचे प्रबंधक आणि वाहतूक पोलिसांना निवेदन दिले. या मुलांना प्रतिबंध करून शाळेत पाठवावे, जेतवननगर येथे पालिकेच्या निवासी शाळेत त्यांची निवास आणि भोजनाची व्यवस्था केली जाईल, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी सुनील खेलुकर, बाळासाहेब कडलग, नितीन देशमुख, पुष्पा नवले, मोतीराम पवार, प्रशांत पवार, हरिश्चंद्र भोये, शिवाजी ठाकरे, शेखर धुमाळ यांच्यासह अन्य शिक्षक संघटना पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)