महाराजांच्या कार्यातून स्फूर्ती घ्यावी

By Admin | Updated: March 11, 2015 00:06 IST2015-03-11T00:05:48+5:302015-03-11T00:06:02+5:30

शिवराज गोले : शिवनेरी ग्रुपतर्फे शिवजयंतीनिमित्त व्याख्यान

Take inspiration from the work of Shri Maharaj | महाराजांच्या कार्यातून स्फूर्ती घ्यावी

महाराजांच्या कार्यातून स्फूर्ती घ्यावी

नाशिकरोड : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यातून आपण स्फूर्ती घेतली पाहिजे. माय मराठी वाचविण्यासाठी प्रत्येकाने मराठी वाचनाची गोडी लावा, मराठीची गोडी आपल्या कुटुंबापासून सुरू करा, असे प्रतिपादन लेखक शिवराज गोले यांनी केले.
भारत प्रतिभूती व चलार्थ पत्र मुद्रणालयातील शिवनेरी ग्रुपतर्फे भारत प्रतिभुती मुद्रणालयाच्या प्रवेशद्वारासमोर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ‘जगण्याची कला-५१ सूत्रे’ या विषयावर बोलताना गोले म्हणाले की, महाराजांसारखे स्वाभिमानाने जगण्याचे शिका, शब्दात ताकद असते तो माणूस जोडतो पण तोडतोही. संवादाची साधने वाढली परंतु प्रत्येकामधील संवाद कमी झाल्याचे गोले यांनी सांगितले.
ज्या कामात आनंद आहे ते काम करा, त्यात यश आहे. यश पैशात मोजता येत नसून, ते आनंदात, माणुसकीमध्ये असते. प्रेम, समाधान, जिव्हाळा, मैत्री, शांती, आनंद या गोष्टी पैशाने मिळत नाहीत. आनंद, विनोद आपल्या अंतरंगातून आले पाहिजेत, असे गोले यांनी स्पष्ट केले. प्रारंभी कामगार नेते जगदीश गोडसे, रामभाऊ जगताप, ज्ञानेश्वर जुंद्रे, अशोक गायधनी, प्रकाश पगारे, माधव लहांगे, गोकुळ काळे आदिंच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी अशोक सुजगुरे, तानाजी कोठुळे, किरण गांगुर्डे, संपत कडलग, मोहन मते, भूषण मेढे, दीपक आंबेकर, रामदास हिरे, नाना पाळदे, रंगनाथ शिरसाठ आदिंसह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Take inspiration from the work of Shri Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.