बुलेट घेऊन ठेवा.. मी येतोच!
By Admin | Updated: September 19, 2016 23:05 IST2016-09-19T23:02:38+5:302016-09-19T23:05:03+5:30
खडांगळीकर शोकसागरात : शहीद संदीपच्या आठवणींनी सारेच गहिवरले

बुलेट घेऊन ठेवा.. मी येतोच!
शैलेश कर्पे ल्ल सिन्नर
‘बुलेट घेऊन ठेवा, मी २८ सप्टेंबरला सुटीवर येणार आहे..’ असे शहीद संदीप ठोक या वीर जवानाने फोनवर सांगितले होते. शनिवारी सायंकाळी कुटुंबीयांसोबत संदीप यांचे शेवटचे बोलणे झाले. त्यानंतर रविवारपासून त्याचा फोन लागत नसल्याने ठोक कुटुंबीय काळजीत होते. सोमवारी पहाटे संदीप यास वीरमरण आल्याची वार्ता खडांगळी गावात आली आणि संपूर्ण गाव शोकसागरात बुडाल्याचे चित्र होते.
सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी कुटुंबातील संदीप सोमनाथ ठोक (२५) हे २०१४ मध्ये भारतीय लष्करात भरती झाले. १७ आॅक्टोबर १९९१ रोजी जन्मलेल्या संदीप यांनी प्राथमिक शिक्षण खडांगळी शाळेत घेतले. त्यानंतर वडांगळी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण घेतले. त्यानंतर सिन्नर महाविद्यालयात किमान कौशल्य शाखेचे शिक्षण सुरू केले. याचवेळी पनवेल येथे लष्कराची भरती सुरू होती. संदीप यांनी पनवेल गाठले. शेतीकाम व कष्ट करण्याची तयारी असल्याने पहिल्याच प्रयत्नात संदीप यांची लष्करात भरती झाली. त्यानंतर संदीप यांनी बिहार, बेंगळुरू, पश्चिम बंगाल, भूतान व जम्मू येथे सेवा केली.
सुमारे दोन वर्षाच्या लष्कराच्या नोकरीत संदीप जेव्हा घरी येत तेव्हा कुटुंबीय व मित्रपरिवारासोबत मनमोकळ्या गप्पा मारत होते. संदीप यांचा मित्रपरिवार मोठा होता. घरी आल्यानंतर संदीप यांनी शेतीकामाची लाज कधी बाळगली नाही. गेल्या दोन महिन्यांपूर्वीच संदीप हे सुटीवर आले होते. संदीप यांची दोन महिन्यांपूर्वीच काश्मीर खोऱ्यातील उरी शहरात बदली झाली होती. तेव्हापासून संदीप उरी येथे होते. भारतीय लष्कराच्या ताब्यातील एका तळात घुसून दहशतवाद्यांनी सशस्त्र आत्मघाती हल्ला केला. यात २० जवान शहीद झाले. यात सिन्नर ताालुक्यातील खडांगळी येथील संदीप ठोक यांचा समावेश आहे. या घटनेची माहिती रविवारी पहाटे खडांगळी गावात पसरल्यानंतर ग्रामस्थ शोकसागरात बुडाले.
संदीप ठोक यांची वस्ती खडांगळी-सोमठाणे रस्त्यावर आहे. ठोक यांच्या कुटुंबीयांना लवकर या घटनेची माहिती समजू नये व त्यांना धक्का बसू नये याची काळजी
घेण्यात येत होती. मात्र काही काळातच ही माहिती समजताच ठोक कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. शहीद संदीप यांच्या पश्चात आजी, आई, वडील, भाऊ, वहिनी, दोन बहिणी असा परिवार आहे.