संपकरी डॉक्टरांवर कारवाई करा
By Admin | Updated: March 23, 2017 23:56 IST2017-03-23T23:55:55+5:302017-03-23T23:56:13+5:30
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसने रुग्णसेवा नाकारणाऱ्या संपकरी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे

संपकरी डॉक्टरांवर कारवाई करा
नाशिक : राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांवर होत असलेल्या वाढत्या हल्ल्यांचा निषेध नोंदवून राष्ट्रवादी काँग्रेसने रुग्णसेवा नाकारणाऱ्या संपकरी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, राज्यात कायदा व सुव्यवस्था ढासळली असून, डॉक्टरांवर हल्ले होऊ लागले आहेत, त्यामुळे डॉक्टरांसाठी असणारे कायदे अधिकाधिक कठोर करावे व त्याची अंमलबजावणी व्हावी, मात्र राज्यात स्वाइन फ्लूसारख्या आजारांनी थैमान घातल्याने रुग्ण दगावत आहेत. अशा परिस्थितीत गेल्या तीन ते चार दिवसांपासून डॉक्टर वर्ग सामूहिक रजेवर गेले आहेत व त्यामुळे रुग्णांचे हाल होऊ लागले आहेत. काही रुग्ण दगावण्याच्या परिस्थितीत शासनाने त्वरित काही तरी पर्यायी मार्ग काढावा व रुग्णांना सेवा उपलब्ध करून द्यावी.
शासनाच्या आदेशाला न जुमानणाऱ्या असंवेदनशील डॉक्टरांवर कारवाई करावी. निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अॅड. सुरेश आव्हाड, प्रकाश माळोदे, नासिर पठाण, स्वप्नील दुसाने, नंदा राऊत, उमेश बोरसे, जयश्री कुंवर, नीलेश खराटे, अनिल अहेर, मंगेश सोनार आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)