खोटे अहवाल पाठविणाऱ्या बीडीओेंवर कारवाई करा
By Admin | Updated: July 17, 2014 22:01 IST2014-07-17T01:08:15+5:302014-07-17T22:01:31+5:30
खोटे अहवाल पाठविणाऱ्या बीडीओेंवर कारवाई करा

खोटे अहवाल पाठविणाऱ्या बीडीओेंवर कारवाई करा
नाशिक : दूषित पाणीपुरवठ्यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे दूषित पाण्याचे सदोष अहवाल पाठविणाऱ्या गटविकास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, असा ठराव जिल्हा परिषदेच्या आरोेग्य समितीच्या बैठकीत संमत करण्यात आला.
आरोग्य सभापती ज्योती बाळासाहेब माळी यांच्या उपस्थितीत आरोग्य समितीची बैठक झाली. बैठकीत पुरुष आणि महिलांच्या लिंगोत्तर चाचणीबाबत चर्चा झाली. पुरुषांमागे महिलांची जी आकडेवारी दिली जाते, ती खरोखरच आहे काय? त्यासंदर्भात मानव विकास कार्यक्रमांतर्गत गर्भवती महिलांची सोनोग्राफी करण्याची सुविधा असते. त्यानुसार अशी लिंगोत्तर चाचणी घेऊन खरोखर हे प्रमाण किती आहे याची तपासणी करावी, असा ठराव बैठकीत संमत करण्यात आला. त्याचप्रमाणे दूषित पाण्याचा आढावा घेण्यात आला. त्यात सर्वाधिक दूषित पाणीपुरवठा बागलाण- ४७ टक्के, त्या खालोखाल दिंडोरी- ४५, सिन्नर- ४०, पेठ- ३७, इगतपुरी- ३२, सुरगाणा- २३ आदि तालुक्यांत असून, जिल्ह्णात एकूण १९९३ पाणी नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यात ४९७ (२५ टक्के) पाणी नमुने दूषित आढळले. ज्या तालुक्यातून दूषित पाणी नमुन्यांची संख्या कमी आहे, त्यांनी ते खरोखरच पाणी नमुने घेतले आहेत काय? ज्यांनी हे नमुने सदोष पाठविले असतील अशा गटविकास अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, असा ठराव डॉ. भारती पवार यांनी मांडला. त्यास संदीप पाटील यांनी अनुमोदन दिले. जिल्ह्यात हिवताप, डेंग्यू, चिकुनगुन्या यांच्या साथीबाबत आढावा घेण्यात आला. त्यात मालेगाव तालुक्यात वलवाडे (वडनेर खाकुर्डी) येथे एकाचा डेंग्यूने, तर सोनज (मुंगसे) येथे एकाचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे यांनी दिली. (प्रतिनिधी)